नांदेड| जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा व एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी तसेच थेट अध्यक्षाच्या निवडीसाठी मतदान शांततेत व सुरळीत पार पडले. जिल्ह्यातील 291 मतदान केंद्रावर 92 हजार 48 पुरुष तर 90 हजार 354 महिला व इतर 7 असे एकूण 1 लाख 82 हजार 409 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे.


अध्यक्ष पदासाठी 71 तर सदस्य पदासाठी 873 उमेदवारांसाठी जिल्ह्यातील सामान्यासह नागरिकांसह दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी, महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच जिल्ह्यात 10 नगरपरिषदा व 1 नगरपंचायतीसाठी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. काही ठिकाणी रात्री उशिरापर्यत मतदान सुरु होते. सामान्य नागरिकांसह महिला, दिव्यांग, वयोवृध्द, तृतीयपंथी यांनी उत्साहाने मतदान केले.


जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणूकीसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने निवडणूक कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी केली होती. जिल्हा प्रशासनाचे सुयोग्य नियोजनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, शांततेत मतदानाची प्रक्रीया पार पडली.


मतदानाच्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजेपर्यत जिल्ह्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीत पुढीलप्रमाणे मतदानाची टक्केवारी आहे. देगलूर- 71.31 टक्के , बिलोली- 75.62 कुंडलवाडी- 79.39, उमरी-71.53, मुदखेड-73.55, भोकर- 75.27, हिमायतनगर-77.71, किनवट – 74.27, हदगाव- 65.80, लोहा- 81.80, कंधार-76.02 टक्के असे एकूण 74.75 टक्के मतदान झाले.


काल सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील लोहा,कंधार, मुदखेड, भोकर, उमरी येथील विविध नगरपरिषदातील मतदान केंद्राना भेटी देवून पाहणी केली. जिल्ह्यात मतदानासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत व सुरळीत पार पडले.


