नांदेड,अनिल मादसवार| जिल्हयातील अवैद्य दारू गाळप व विक्री करणारे विरोधात दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी मासरेडचे आयोजन करण्यात आले होते. सदर मासरेडमध्ये एकाच दिवसात 93 केसेस करून95 आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात एकुण 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेडच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी उमाप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध व्यवसाय, गुन्हेगारीविरुध्द कारवाया करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अबिनाशकुमार यांची नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नेमणूक झाली. दरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणी पोलिसांनी धाडसत्र सुरु करून एकाच दिवशी १० ऑगस्ट रोजी अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाया करून अवैध दारुविक्री विरोधात 93 केसेस करून 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला तसेच ९५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पुढील प्रमाणे अवैद्य दारू विक्री व गाळप करणारे व्यक्ती विरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. या कारवाईत देशी दारू बॉटल 1324 किंमत 84 हजार 250 रूपये, विदेशी दारू बॉटल 27 एकूण किंमत 4480 रूपये, हातभट्टी 285 लिटर 26,200 रूपये, रसायण 2245 लिटर 1 लक्ष 24 हजार 310 रूपये, शिंदी 1962 लिटर 40 हजार 655 रूपये असा एकूण 2 लक्ष 79 हजार 895 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही शहाजी उमाप, पोलीस उप महानिरीक्षक नांदेड, परिक्षेत्र नांदेड व अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयातील 36 पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.