श्रीक्षेत्र माळेगाव, मिलिंद व्यवहारे। जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने श्रीक्षेत्र माळेगाव येथे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची दालने थाटण्यात आली आहे. यात्रेतील कृषी प्रदर्शनाचेही उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनात विविध दालने आहेत. ज्यामध्ये वैशिष्ट्यपुर्ण वाणाचे विविध फळ, भाजीपाला आणि पिकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहेत. तसेच कृषी अवजारांची, खते व विविध कृषोपयोगी उपकरणे-घटकांची दालने आहेत. याशिवाय शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, समाज कल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषि व पशुसंवर्धन विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, यांच्यासह विविध विभागाचे दालने आहेत. त्यांचेही मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध जनावरे घेऊन पशुमालक दाखल झाले आहेत. उच्च प्रतीची जनावरे मिळण्याचे दक्षिण भारतातील महत्वाचे ठिकाण म्हणून यात्रेचा लौकिक आहे. याठिकाणी व्यापाऱ्यांची अनेक वस्तु विक्रीची दुकाने थाटली. शेती आणि घरातील उपयोगाच्या लहान-मोठ्या वस्तु या यात्रेत नागरिक खरेदी करीत असल्याने यावर्षीही व्यापारपेठ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या लहान मुलांपासून थोरा-मोठ्या पर्यंतच्या सर्व प्रकारच्या मनोरंजनाच्या गोष्टींनी ही यात्रा सजली आहे. लोककलाच्या सादरीकरणासाठी कलावंतांच्या संचांनी ठिकठिकाणी तंबू थाटले आहेत. मनोरंजनाच्या खेळांचे अनेकविध प्रकारही दाखल झाले आहेत.
जिल्हा परिषदेने दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक स्पर्धा, पशुपालकासाठी स्पर्धा, पशु प्रदर्शन यांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषि विभाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 वर्षातील कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराने 32 शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. याशिवाय लोककला, आणि लावणी महोत्सवही यात्रेचे मोठे आकर्षण आहे. यात्रेसाठी आरोग्यविषयक सुविधा आणि पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.
माळेगावात मिडिया सेंटरचे उद्घाटन
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा येथे माध्यमांना माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने मिडीया सेंटरची स्थापना करण्यात आली असून गुरुवार दिनांक 22 डिसेंबर रोजी ग्राम पंचायतीमध्ये मिडीया सेंटरचे उदघाटन सरपंच प्रतिनिधी हाणमंत धुळगंडे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मिडीया सेंटरचे प्रमुख मिलिंद व्यवहारे, शिवाजी टोम्पे, नंदलाल लोकडे, सुर्यकांत हिंगमीरे, दत्ता इंदूरकर, लक्ष्मीकांत टाकळकर, पत्रकार नागनाथ पुरी, एकनाथ तिडके, विनायक जोशी, किशन जाधव, विजय वाघमारे, अर्जुनसिंह विनोद मस्के, बालाजी नागसाखरे, उप सरपंच बालाजी नंदाने, बाबुराव वाघमारे, गोपाळ पाटील, भाऊसाहेब वाघमारे, ग्राम विकास अधिकारी संभाजी धुळगंडे, खंडू साखरे, यांची उपस्थिती होती.
माळेगाव ग्राम पंचायतीमध्ये मिडीया सेंटरची स्थापना करण्यात आली असून माळेगाव यात्रेत चालणा-या विविध उपक्रमांची माहिती जिल्हा परिषदेच्या खाते प्रमुखांनी मिडीया सेंटरला देण्याचे आवाहन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले आहे.