नागपूर। कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांच्या महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या व चिथावणी देणाऱ्या ट्वीट्सबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सीमाप्रश्नासंदर्भात झालेल्या महाराष्ट्राच्या अवमाननेचा व राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा मुद्दा लावून धरला होता. बुधवारी विधीमंडळातील कामकाजादरम्यान चव्हाण यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
ते म्हणाले की, सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राची बदनामी करणारे ते ट्वीट बोम्मई यांच्या व्हेरिफाईड हॅंडलवरून झाले आहेत. त्या ट्वीटर हॅंडलला ब्ल्यु टिक आहे. अजूनही ते ट्वीट डिलिट झालेले नाहीत. तरीही महाराष्ट्राचे सरकार त्यांनी पाठीशी का घालते? ते हॅंडल फेक असल्याचे सांगून आपण त्यांची पाठराखण का करतो? कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर आरोप करीत असताना राज्य सरकार शांत का आहे? असे अनेक प्रश्न चव्हाण यांनी यावेळी विधानसभेत उपस्थित केले.