उस्माननगर, माणिक भिसे l लोहा तालुक्यातील वाका येथे ग्रामदैवत असलेल्या श्री वाजेश्वर बाबा यांच्या यात्रेनिमित्त दुपारी कुस्त्यांची दंगल झाली. त्यात जिल्ह्यातून नामवंत मल्लांनी हजेरी लावत. आपल्या डावपेचांच्या कौशल्याने विरोधी मल्लांना आस्मान दाखवत कुस्त्यांचा फड गाजवला .


मात्र शेवटची मानाची कुस्ती ही तुल्यबळ लढत होऊन निर्धारित वेळेत चित पट न झाल्याने अखेर पंचकमिटीने बरोबरीत कुस्ती सोडवली व ११ हजार रुपयांचे बक्षीस आदित्य ब्राम्हणवाडेकर व हणमंत किवळेकर या दोन पैलवांनाना विभागून दिले.
वाका येथील श्री वाजेश्वर बाबा यात्रा ही पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. चारशे वर्षांची परंपरा असलेली यात्रा , पालखी मिरवणूक व पारंपारिक भजनी मंडळाचे गायन व दुपारी कुस्त्यांची दंगल झाली. त्यात अतिशय रोमंचक व चित्तथरारक अशा १०३ लढती झाल्या विजेत्यांना रोख बक्षीसे देऊन पंच कमिटीचे वतीने गौरविण्यात आले.


मात्र शेवटची मानाची कुस्ती ही चित पट ऐवजी तुल्यबळ लढतीमुळे बरोबरीत सोडवून अखेर बक्षीस विभागून दिल्याचे पंचकमिटीकडून सांगण्यात आले . यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार , बीट जमादार अशोक हंबर्डे, पो.हे.कॉ. गंगाधर चिंतोरे , माधव पवार, तुकाराम जुन्ने आदीसह उस्माननगर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . यावेळी पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.




