हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारच्या शुभ मुहूर्तावर शिवसेनेने हिमायतनगरात दिमाखात शक्तीप्रदर्शन केले. आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नेतृत्वात शहरात काढण्यात आलेल्या महारॅलीने वातावरण ढवळून निघाले. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजीच्या तालात आणि शिवसेनेच्या भगव्या समुद्राने संपूर्ण शहर रंगून गेले.


रॅलीपूर्वी ग्रामदैवत श्री परमेश्वर, हनुमान मंदिर, माताकालिंका मंदिर आणि बौद्ध विहार येथे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीत महिला, तरुणाई आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

रॅलीनंतर बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले, “मागील सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास न करता फक्त स्वहित साधलं. आज शहराची अवस्था एखाद्या खेड्यापेक्षा वाईट आहे.” ते पुढे म्हणाले कि, शहराला स्वच्छ पाणीपुरवठा, दुर्गंधीमुक्त ड्रेनेज प्रणाली, शिकण्याच्या आणि रोजगाराच्या संधी, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी आम्ही ठोस आराखडा तयार केला आहे. नगराध्यक्षपदासाठी रामभाऊ ठाकरे हा विश्वासार्ह आणि विकासाभिमुख आश्वासक चेहरा दिल्याचे त्यांनी सांगितले.



“हवा बदललीय — सत्ता भगव्याची!”
जोरदार उत्साह, तुफान घोषणाबाजी आणि समर्थकांची गर्दी पाहता शहरात एकच चर्चा होत असून, या निवडणुकीत “हिमायतनगर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा नक्कीच फडकणार असा आत्मविश्वास आमदार कोहळीकर यांनी व्यक्त केला. कारण मागील सत्ताधार्यांनी विकासाच्या नावाखाली स्वतःचीच घरे भरली असून, शहराच्या विकासाच्या नावाखाली बकाल अवस्था करून टाकली आहे. आजघडीला जिकडे तिकडे नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर येत असून, चौकाचौकात दुर्गंधी सुटली आहे. रात्रीला पथदिवे बंद राहत असल्याने खड्डेमय रस्यावर पडून अनेकजण जखमी होत आहेत. एकूणच नागरिकांच्या रोग्यासह सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, हे सर्व चित्र बदलण्यासाठी सत्ता बदलणे आवश्यक आहे.

