नांदेड| २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विविध शाळा महाविद्यालयांतून तसेच स्विपद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामी जवळा दे. येथील काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पथनाट्याचे उत्तम सादरीकरण केले.
घरातच बसता का गं तुम्ही, मतदान करु या साऱ्या जणी…बाई बाहेर ये गे मत देऊन ये अशा प्रकारे गीतांच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे जवळ्यात मतदानजागृती करण्यात आले. चिमुकल्यानी पथनाट्याद्वारे गावकऱ्यांचे लक्ष वेधले. लेखक गंगाधर ढवळे यांनी लिहिलेल्या पटकथेवरुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा दे. येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष घटकार, हैदर शेख यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
नांदेड दक्षिण मतदारसंघातील जवळा देशमुख ता मतदान केंद्रांतर्गत मतदान जनजागृतीसाठी शाळेतील शिक्षक, केंद्रप्रमुख तसेच विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. या पथनाट्याद्वारे मुलींनी गावातील सर्व महिलांना तसेच पुरुष मतदारांचे लक्ष वेधून मतदान करण्याबाबत आवाहन केले.
दीपावली सुट्टी असतांनाही शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा सहशिक्षक संतोष घटकार तसेच केंद्रप्रमुख संतोष अंबुलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काही विद्यार्थ्यांनीनी पुढाकार घेत गावातील ठीक ठिकाणी पथनाट्य सादर केले. या पथनाट्यात मी मतदान करणारच! अशा टोप्या घातलेल्या ज्ञानवी पांचाळ, अपेक्षा गोडबोले, मोनिका गोडबोले, ज्ञानेश्वरी शिखरे, शिवानी शिखरे, आकांक्षा गोडबोले, आर्या गच्चे, श्रुती गच्चे आदी विद्यार्थ्यांनीनी मतदान जनजागृतीत सहभाग घेतला होता.