हिमायतनगर, अनिल मादसवार| वाढोणा शहरातील पुरातन कालीन भगवान व्यंकटेश बालाजी मंदिरात विजयादशमी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली. पहाटे ४ वाजता अभिषेक–महापूजन संपन्न झाली, तर सायंकाळी कालिंका माता मंदिरातून निघालेली सीमोल्लंघन दशहरा मीरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांनी दर्शन घेऊन बुंदीचा प्रसाद मिळविला. तर रात्री नऊ वाजता अहंकाररूपी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या दहन करून, येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वाढोणा नगरीत विजयदशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.



शहरातील बालाजी मंदिरात गोविंद – गोविंदाच्या गजरात दर्शनासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. यासह शहरातील ठिकठिकाणच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणात महिला – पुरुषांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. हिमायतनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे पारंपारीक पध्दतीने सोने लुटण्यासाठी येथील कालिंका मंदिरापासून ढोल – तश्याच्या गजरात हाती मशाल घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यात गावातील प्रमुख लोकांनी सहभाग घेऊन सीमोल्लंघन करत सोने लुटले. त्यानंतर शहरातील सर्व देवी – देवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांनी भेट घेवून एकमेंकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कालिंका मंदिरातून निघालेल्या मिरवणुकीतील नागरिकांनी सोने लुटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जय श्रीराम.. भारत माता कि जय… वंदे मातरम… कालिंका माता कि जय… व्यंकटेश बालाजी कि जयच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता.


त्यानंतर रात्री ९ वाजता हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने ५० फुट उंचीच्या रावणाचे दहन करण्यात आले. गेल्या २० वर्षापासन हिमायतनगर बजरंग दल शाखेच्या वतीने रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी फटाक्याच्या अतिशबाजीत होणाऱ्या रावणाच्या दहनाचा सोहळाचे साक्षीदार होण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तत्पूर्वी अनेक मान्यवरांनी उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आपल्यातील अहंकारमय रावणाच्या वृत्तीचा त्याग करण्याचे आवाहन केले. रावण दहनाच्या वेळी झालेल्या फटाक्यांची आतिषबाजी पाहून नागरिकांचे डोळे दिपून गेले होते.



