हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर पुन्हा एकदा समोर आला आहे. वडगाव तांडा शिवारात शनिवारी सकाळी तरुण शेतकरी उल्हास अनिल जाधव याच्यावर बिबट्याने अचानक झडप घेत प्राणघातक हल्ला केला. थरारक झटापटीच्या प्रसंगात शेतकरी आरडा ओरडा करताच जवळील जनावरे धावत आली, त्यानंतर बिबट्याने पळ काढल्याने शेतकरी बालंबाल बचावला आहे.


शनिवारी सकाळी सुमारास 11 वाजता उल्हास राठोड नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी शिवारात गेला असताना झुडपात दडी मारून बसलेल्या बिबट्याने अंगावर झेप घेतली. काही क्षण शेतकरी-बिबट्या झटापट सुरू राहिली. आरडाओरड ऐकून जनावरे तसेच काही शेतकरी धावत आले, त्यानंतर बिबट्याने माघार घेत धूम ठोकली. या धक्कादायक हल्ल्यात शेतकऱ्याचे कपडे फाटले असून, किरकोळ दुखापत झाली आहे.



घटनेची माहिती मिळताच इस्लापूर वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, हिमायतनगर वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील, वनपाल अमोल कदम, वनरक्षक यमजलवाड, वानोळे, तसेच पोलीस पाटील अंकुश राठोड यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.


हिमायतनगर तालुक्यातील वारंगटाकळी, वडगाव तांडा, सवना, वाळकेवाडी, परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, गेल्या काही दिवसांत अनेक शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



