हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील पाच शिव महादेव फाटा येथे पार्श्वनाथ महादेव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धा गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत उंबरहिरा तांडा येथील संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावून स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.


अंतिम सामन्यात उंबरहिरा तांडा संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजेतेपद मिळवले. खेळाडूंच्या चपळ चढाया, अचूक बचाव व संघभावनेमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्पर्धेत वडगाव (ज.) येथील संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस —— संघाला मिळाले.

स्पर्धेतील प्रथम बक्षीस १५,००१ रुपये उंबरहिरा तांडा संघाला माजी सरपंच सुभाषराव सिल्लेवाड यांच्या वतीने देण्यात आले. द्वितीय बक्षीस ७,००१ रुपये सरपंच शंकरराव वागतकर व माजी सरपंच रामदास भडंगे यांच्या वतीने वडगाव संघाला प्रदान करण्यात आले. तृतीय बक्षीस ५,००० रुपये उपसरपंच रोशन धनवे यांच्या वतीने देण्यात आले.


या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संभाजी मेंडके उपस्थित होते. त्यांनी विजेत्या व सहभागी सर्व संघांचे अभिनंदन करत खेळाडूंना मार्गदर्शन केले.
“ग्रामीण भागातील युवकांनी कबड्डीसारख्या मैदानी खेळात सातत्याने सहभाग घ्यावा. खेळामुळे शिस्त, संघभावना व आत्मविश्वास वाढतो. अशाच स्पर्धांमधून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतात,” असे प्रतिपादन नगरसेवक प्रतिनिधी रमेश पंडित यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सोनबा राऊत, वसंत जाधव, सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल बापुराव बोड्डावार, मारोतराव पाटील (आक्कलवाड), भीमराव आडे, कृष्णा भुसाळे, दिगंबर अनगुलवार, अरुण जाधव आदींसह समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरणप्रसंगी अशोक आडे, सुनील आडे, अनिल आडे, किशोर भुराजी टारफे, पुराजी जाधव, पांडुरंग गुंडेकर, विठ्ठल गुंडेकर, विश्वंभर बळीराम जाधव यांचा यात्रा कमिटीच्या वतीने श्रींचा प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

