उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील किवळा साठवण तलावाजवळील खदानीतील पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. दोघेही खदानीशेजारी रील्स बनवत असल्याचे सांगण्यात आले. दोघांचेही मृतदेह रात्री दहा वाजताच्या सुमारास बाहेर काढण्यात आले.


शेख बाबर शेख जफर (वय १५, रा. बळीरामपूर, नांदेड), मोहम्मद रेहान मोहम्मद युसूफ (वय १६, रा. देगलूर नाका, नांदेड) अशी मयतांची नावे आहेत. दोघेही गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास साठवण तलावा शेजारील सांडव्या जवळ असलेल्या खदानीजवळ रील्स बनवत होते. यावेळी काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी त्यांना रील्स बनविताना पाहिले होते. मात्र, दोघेही तोल जाऊन खदानीत पडल्याने घटनास्थळी असलेल्या इतर मुलांनी तेथून पळ काढला.



घटनेची माहिती मिळताच इतवाराचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह तासाभराच्या फरकाने रात्री बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. सोनखेड पोलिसांना या कामी जीवरक्षक दलाची मदत घ्यावी लागली.




