हिमायतनगर। हिमायतनगर ते ढाणकीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे रस्त्यावर गिट्टी उघडी पडली आहे. तसेच पाऊस सुरू असल्यामुळे मुरूम आणि गिट्टीमुळे दुचाकी स्लिप होऊन सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास पडल्याने दोघा जणाला गंभीर मार लागला आहे. असे अपघात नित्याचेच झाले असून, एखादा मेल्याशिवाय रस्त्याचे काम पूर्ण होणार नाही का..? असा संतप्त सवाल या भागातील शेतकरी संतोष गाजेवार यांनी व्यक्त करून तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करून द्या अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना पत्रकारांशी बोलताना दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिंगोली लोकसभा मतदार संघात येणाऱ्या आणि नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याला जोडणारा सिरपल्ली – डोल्हारी – पळसपूर – हिमायतनगर या प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच काम दोन वर्षांपासून अत्यन्त संत गतीने केले जाते आहे, एव्हढंच नाहीतर वर्षभरापासून ठेकेदाराने रस्त्याचं काम अर्धवट ठेवल्यामुळे सर्वसामान्य नागरीकातून संबंधित ठेकदार आमदार, खासदार यांच्या दुर्लक्षित कारभार, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या रस्त्यावरील गावच्या लोकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. अर्धवट रस्त्यामुळे अनेकांना उन्हाळ्यात उघडी पडलेल्या गिट्टी व खड्डयासह अर्धवट रस्त्यामुळे वाहनधारकांना पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार व अपघाताचा सामना करावा लागला आहे. आता पावसाळ्यात देखील अर्धवट रस्त्यावर अल्पसा पाऊस होताच चिखलम रस्ता झाल्याने ये जा करतांना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार असून, रस्त्यावर उखडलेली गिट्टी आणि चिखलाचे पेंड यामुळे वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत.
आज सोमवार दिनांक ८ रोजी तालुक्यातील हिमायतनगर – पळसपुर रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली असून, पाऊस पडतात चिखल होऊन शेतीकडे दूध काढून आनंण्यासाठी जात असलेल्या दोन शेतकऱ्यांच्या दुचाकी गिट्टीवरून स्लिप होऊन दोघेही धाडदिशा रस्त्यावर पडले. या ठिकाणी उघडे असलेल्या गिट्टीने दोघांच्या डोक्याला, गुडघ्याला, हाताला गंभीर मार लागल्याने परिसरातील शेतकरी संतोष गाजेवार यांनी तातडीने रस्त्यावर पडलेल्या त्या दोघांना हिमायतनगर येथील खाजगी रुग्णाला दाखल करून उपचार केले.
या अपघातात एकाच्या टोंगळे फुटले असून, चाळ्यांना गंभीर मार लागल्याने टाके लावण्यात आले आहे. तर दुसऱ्याच्या हाताला, पायाला जखम झाली असून, त्याच्यावर देखील उपचार करण्यात आले आहेत. एकूणच अपघातग्रस्तांना तातडीने उपचारासाठी दाखल केले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. या अपघाताला कारणीभूत असलेल्या ठेकेदारावर आणि अभियंत्यावर योग्य ती कारवाई करावी आणि तात्काळ या भागातील अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी केली जात आहे. अन्यथा हिमायतनगर, पळसपूर, शेलोडा, सिरपल्ली व ढाणकी येथील नागरिक व शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना पत्रकारांशी बोलताना रुग्णालयात उपस्थित झालेल्या नागरिकांनी दिला आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामाकडे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेबानी लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शेतकरी संतोष गाजेवार, मंगेश धुमाळे, संतोष नरवाडे यांच्यासह अनेक शेतकरी नागरिकांनी केली आहे.