नांदेड| पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड जिल्हयातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन, आरोपीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या.
नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने 38 MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे विविध कलमान्वये सन 2023 मध्ये 26 टोळ्यामधील 76 इसमांना व सन 2024 मध्ये 6 टोळ्यामधील 22 इसमांना नांदेड जिल्हयाचे बाहेर हद्दपार करण्यात आले असुन, MPDA अंतर्गत 17 आरोपीतांना कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आले आहे.
पोलीस ठाणे इतवारा यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे अजय पिता सत्यप्रकाशसिंह ठाकुर वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. चिरागगल्ली, इतवारा, नांदेड ता. जि. नांदेड व तसेच पोलीस ठाणे वजिराबाद यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे मोहित ऊर्फ चिकु पिता रमेश गोडबोले वय 21 वर्ष व्यवसाय बेरोजगार रा. देगावचाळ, नांदेड ता. जि. नांदेड या दोन्ही आरोपी विरुध्द गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, बेकायदेशिरित्या शस्त्र बाळगणे त्याचा वापर करणे, अशलील शिवीगाळ करणे, चोरी करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्राने दुखापत करणे, खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र बाळगणे, दरोडयाचा प्रयत्न करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे सादर करण्यात आला होता.
नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अभिजित राऊत यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हा धोकादायक व्यक्ती सिध्द झाल्याने आरोपी नामे (1) अजय पिता सत्यप्रकाशसिंह ठाकुर वय 21 वर्ष व्यवसाय बेकार रा. चिरागगल्ली, इतवारा, नांदेड ता. जि. नांदेड, (2) मोहित ऊर्फ चिकु पिता रमेश गोडबोले वय 21 वर्ष व्यवसाय बेरोजगार रा. देगावचाळ, नांदेड ता. जि. नांदेड यांना एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहे. नमुद आरोपीस मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एक वर्षासाठी स्थानबध्द केले आहे. यापुर्वी नांदेड जिल्हयातील 16 गुन्हेगांराना MPDA कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 17 झाली आहे.