नांदेड,अनिल मादसवार। नांदेड शहरात सकाळी 7:15 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून, नांदेड शहरासह शेजारील परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही भागात सौम्य धक्के बसले आहेत. नागरीकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवाना बळी पडू नये याबाबत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केलचा होता. भूकंपा पासून बचावाची जनजागृती केली जाईल असे सांगून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत.
नांदेड शहरातील मोरचौक ,वेदानगर, यश नगरी, तसेच अर्धापुर भागात सकाळी सात वाजून पंधरा मिनिटाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंप होऊ लागल्याने जाणवताच अनेक नागरिक जिवाच्या भीतीने घराबाहेर पडले होते. तसेच भूकंप बाबत चर्चा करत होते, भूकंपाचे सौम्य धक्के बसताच सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली असून, नांदेड सोबतच हिंगोली, परभणी जिल्ह्यात देखील भूकंप जाणवले आसल्याचे समजते. हिंगोली नांदेडच्या मध्यभागी असलेले आखाडा बाळापूर पासून 13 किमी वर म्हणजेच भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या गावाजवळ होते असे सांगितले जाते आहे.
रामेश्वर तांडा, ता. वसमत जिल्हा हिंगोली येथे 10/07/2024 सकाळी 07:14 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंपाची नोंद झाली आहे. अशी माहिती श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगर यांनी दिली.
“वारंगा फाटा च्या पश्चिमेला रामेश्वर तांडा नावाच्या गाव शिवारामध्ये भूकंपाचे केंद्र दिसून येत आहे. स्थानिक माहिती घेतली असता सकाळी सहाच्या दरम्यान सुद्धा हलका हादरा जाणवला होता. आणि आपल्या सगळ्यांना जो जास्तीचा हादरा सव्वासात वाजता जाणवला. त्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन संस्थेने घेतली आहे ती 4.5 अशी दाखवत आहे. गेल्या वेळेस 3.6 चा भूकंप ज्या परिसरात जाणवला होता तोच त्याच परिसरात आजचाही जाणवला आहे. आपल्या विद्यापीठाच्या सर्व भूकंप मापन यंत्राद्वारे येणाऱ्या नोंदीची तपासणी करून घेत आहोत. विद्यापीठाने नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात 16 ठिकाणी भूकंप मापन यंत्रणा उभारली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं जनतेला आवाहन
आज दि. 10 जुलै 2024 रोजी नांदेड शहर व नांदेडमधील सर्वच तालुक्यातून सकाळी 07:14 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात असून नांदेड व परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी त्वरित दगड काढून घ्यावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत यांनी केले आहे.