नांदेड। नांदेड जिल्ह्यातील गुरुवारी दुपारपासून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. दरम्यान झाडाखाली थांबलेल्या ठिकाणी वीज कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. अन्य एका ठिकाणी वीज कोसळून बैल व गाय दगावली आहे. यंदा पावसाळ्याच्या तोंडावर वीज पडून होणाऱ्या दुर्घटना पाहता नागरिक शेतकऱ्यांनी पाऊस पडतांना काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली, नायगाव तालुक्यासह परिसरामध्ये दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, घरावरील टिनपत्रे उडून जाणे व महावितरण कंपनीच्या तारा तुटणे व वीज पोल वाकुन जाणे अश्या घटना घडत आहेत. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बिलोली तालुक्यातील तळणी येथे वीज कोसळली असून, कंधार तालुक्यातील येलूर येथील शंकर पंढरी धर्मेकर वय २५ वर्ष हे लहान भाऊ शिवाजी पंढरी धर्मेकर वय २२ वर्ष हे दुचाकीवरून नरसी मार्गे गावाकडे जात होते.
बिलोली तालुक्यातील तळणी जवळ येताच विजांचा कडकडासह पावसाला सुरुवात झाली. दिवसापासून बचाव करण्यासाठी मोटारसायकल रोडच्या बाजूला उभी करून दोघे भाऊ येथील शेतकरी रमण माऊले यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाखाली जात होते. पुन्हा विजांचा कडकडाट झाल्याने शंकर धर्मेकर यांनी झाडाखाली आसरा घेतला तर त्यांचा भाऊ शिवाजी धर्मेकर हा काही अंतरावर असताना बाभळीच्या झाडावर विज कोसळली यात शंकर धर्मेकर हे जागीच गतप्राण झाले, दैव बलवत्तर म्हणून शिवाजी धर्मेकर थोडक्यात बचावले आहेत.
तसेच शंकरनगर परिसरात वादळीवाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन रामतीर्थ तालुका बिलोली येथील तिरुपती व्यंकटराव पाटील देगलूरे यांच्या आखाड्यावर विज पडल्याने एक बैल जागीच दगवल्याने मोठं नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडे मोडले असून, पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळल्याने पेरणीसाठी बैल कुठून आणावे याची चिंता लागली आहे.
तर नायगाव तालुक्यातील होटाळा येथे लिंबाच्या झाडावर वीज कोसळून झाडाखाली दावणीला बांधलेली दुभती गाय गतप्राण झाली आहे, यात शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान झाले आहे. एकूणच अमावस्येच्या दिवशी झालेल्या या अस्मानी संकटात एका युवकासह मुक्या जनावरांना आपला जीव गमवावा लागला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित शेतकरी व युवकांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत देऊन हातभार लावावा अशी मागणी केली जाते आहे.