नांदेड| शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत असतानाच जुना गंज परिसरातील पहीलवान टी हाऊसच्या मागे गुरुवारी संध्याकाळी घडलेल्या थरारक हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ उडाली. सक्षम ताटे (वय २५) या तरुणाची गोळी झाडून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली आहे.


विश्वसनीय पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हिमेश ममीडवार आणि त्याच्या एका साथीदाराने सक्षमवर थेट हल्ला चढवला. वादाच्या पार्श्वभूमीवर छातीत गोळी झाडल्यानंतर दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आली.


प्राथमिक तपासानुसार सक्षम ताटे आणि आरोपी हिमेश हे पूर्वी अतिशय घनिष्ठ मित्र होते. मात्र प्रेमसंबंधाच्या कारणावरून झालेल्या मतभेदातून दोघांमध्ये तीव्र वैर निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर हिंसक वळणावर जाऊन सक्षमचा जीव घेऊन गेला.


पोलिसांच्या तपासात आरोपी हिमेश व त्याचा साथीदार हे जुन्या परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे समोर आले आहे. सक्षमशी असलेला वाद संपवण्यासाठी ही हत्या पूर्वनियोजितरीत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

चहाच्या दुकानाच्या मागील अंधाऱ्या, ओसाड भागातून रक्ताचे डाग, गोळीचे कवच आणि रक्ताने माखलेला दगड जप्त करण्यात आला. हल्ला अत्यंत जवळून आणि निर्दयीपणे झाल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होते. हत्या करून आरोपी हिमेश ममीडवार व त्याचा साथीदार फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी अनेक पथके रवाना करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व गुन्हेगारी नेटवर्क्सच्या माध्यमातून तपास वेगाने सुरू आहे.
हत्याकांडानंतर परिसरात टेहळणी वाढवण्याचे आदेश
जुन्या परिसरातील वाढते दारू सेवन, मोकाट तरुणांचे टोळके, अनधिकृत बांधकामे आणि चहाच्या खोलींच्या आड चालणारे गैरप्रकार यामुळे पोलिसांवर नागरिकांनी आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या हत्याकांडानंतर परिसरात टेहळणी वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास गुन्हे शाखा आणि इतवारा पोलिस ठाणे संयुक्तरीत्या करत आहेत. शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

