कंधार (सचिन मोरे) दिनांक ३१ डिसेंबर २०२५ च्या आदेशान्वये व प्रस्तुत अधिसूचनेच्या अनुषंगाने कंधार तालुक्यातील ग्रामपंचायत नागलगावचे विभाजन करून दुर्गातांडा, उदातांडा व शिराढोण ग्रामपंचायतचे विभाजन करून नाईक नगर हे ३ तर लोहा तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धनाजीतांडा, परसरामतांडा, रूपशिंगतांडा, फुलमळातांडा, गोविंदतांडा, तर लिंबोटी ग्रामपंचायत अंतर्गत असलेला येलदरी तांडा अशा एकूण ९ तांड्यासाठी महसुली दर्जा प्राप्त होऊन, स्वातंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचे शासनाचे आदेश प्राप्त झाल्यामुळे कंधार व लोहा तालुक्यातील तांडा वाशीयामध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे ऐकावयास मिळत आहे.या महत्व पूर्ण निर्णयामुळे तांडा विकासाचा मार्ग खर्या अर्थाने मोकळा झाल्याची भावना “संत सेवालाल महाराज बंजारा लमानतांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य भगवान राठोड यांनी व्यक्त केली.


नांदेड जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या तांड्याना महसूली दर्जा व ग्रामपंचायत दर्जा द्यावे, म्हणून अनेक वर्षाची मागणी होती, गाव अंतर्गत येणाऱ्या तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत नसल्याने तांडे हे विकासापासून दूर ठेवल्या जात असल्याची भावना समाज बांधवांमध्ये होती.

स्थानिक स्वराज्य संस्थेचे गाव विकासासाठी काम करणारी ग्रामपंचायत ही महत्त्वाची संस्था असून, ग्रामपंचायत अंतर्गत वेगवेगळे विकास कामे राबवून गावाचा विकास केला जातो परंतु जिल्ह्यातील अनेक तांड्यामध्ये ग्रामपंचायत नसल्याकारणाने तांड्याचा विकास झाला नाही, म्हणून शासनाने “संत सेवालाल महाराज बंजारा लमानतांडा समृद्धी योजना” राज्यभरात लागू केली. या योजनेचा फायदा बंजारा समाजाला होत आहे.


दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी शासनाने निर्गमित केलेल्या आदेशात नांदेड जिल्ह्यातील उमरा अंतर्गत धनजी तांडा,परसराम तांडा,रूपसिंग तांडा फुलमळा तांडा,गोविंद तांडा,लिंबोटी अंतर्गत येलदरी तांडा, शिराढोणंतर्गत नाईक नगर, नागलगाव अंतर्गत दुर्गा तांडा, उदा तांडा,या नवीन ग्रामपंचायत निर्माण झाल्या आहेत, या निर्णयाने बंजारा समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून ग्रामपंचायत स्थापन झालेल्या तांड्याच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना ही मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील ही योजना ग्राम विकास मंत्री मा. ना.जयकुमार गोरे हे प्रभावी पणे राबवत असून, मा.धर्मगुरू आ.बाबुशिंगजी महाराज,मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वरजी नाईक यांनी केलेल्या प्रयत्नांना आज यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यभरातील अनेक तांड्यांना ग्रामपंचायत दर्जा मिळत आहे. तांडे विकासाच्या मार्गावर येत आहेत, यामुळे संबंध महाराष्ट्रातील बंजारा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे,”संत सेवालाल महाराज बंजारा लमानतांडा समृद्धी योजने” अंतर्गत ग्रामपंचायतचा दर्जा देऊन,विकासापासून कोसो दूर असणाऱ्या तांड्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत. अशी भावना बंजारा समाजामधून व्यक्त केली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे,बंजारा समाजाचे धर्मगुरू आमदार परमपूज्य बाबू सिंगजी महाराज,मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वरजी नाईक यांच्यासह संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेचे राज्यस्तरीय अशासकीय सदस्य, विभागीय अशासकीय सदस्य, जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य, प्रकाश राठोड, कैलास खसावत, संध्याताई राठोड, तालुकास्तरीय अशासकीय सदस्य, संबंधित ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी,गटविकास अधिकारी,तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, ग्राम विकास विभागाचे संबंधित सर्व अधिकारी यांचे भगवान राठोड यांनी आभार व्यक्त केले आहेत.
ज्या तांड्याचे प्रस्ताव अद्याप तयार झाले नाहीत, अशा सर्व तांड्यावरील समाज बांधवांना विनंती आहे, आपण प्रस्ताव तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, आणि आपल्या तांड्याला न्याय द्यावा. असे आवाहन जिल्हा स्तरीय समितीचे अशासकीय सदस्य भगवान राठोड यांनी केले आहे.

