नांदेड| ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेडच्या मोदी मैदानावर सुरू असलेल्या भव्य कार्यक्रमात धार्मिकतेसोबतच समाजसेवेचा आदर्श ठेवणारी ‘देवाभाऊ चष्मा सेवा’ भाविकांसाठी दिलासादायक ठरत आहे. बदलापूर (जि. ठाणे) येथील सामाजिक कार्यकर्ते साकीब गोरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.


या उपक्रमाअंतर्गत भाविकांची मोफत नेत्रतपासणी करून गरजूंना मोफत चष्मे वितरित करण्यात येत आहेत. शेतकरी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घेत आहेत. दिवसभर तपासणी केंद्रावर गर्दी दिसून येत असून, अनेकांना पहिल्यांदाच डोळ्यांची सखोल तपासणी करून घेण्याची संधी मिळत आहे.

आर्थिक परिस्थितीमुळे चष्मा घेणे शक्य नसलेल्या नागरिकांसाठी ही सेवा वरदान ठरत आहे. महिलां व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मदत व्यवस्था ठेवण्यात आली असून, गर्दी असूनही सेवा शिस्तबद्ध व सुरळीत सुरू आहे. तपासणीनंतर लगेचच आवश्यक त्या क्रमांकाचे चष्मे मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


३४ वर्षांची सेवा, लाखो लाभार्थी
या उपक्रमामागील प्रेरणा स्पष्ट करताना साकीब गोरे यांनी सांगितले की, ते गेल्या ३४ वर्षांपासून अखंडपणे नेत्रसेवेत कार्यरत आहेत. आतापर्यंत ३७ लाख नागरिकांची नेत्रतपासणी, १७ लाख नागरिकांना मोफत चष्मे तसेच ६३ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. शहीदी समागमाच्या निमित्ताने सुरू असलेल्या या नेत्रसेवेमुळे “सेवा हाच खरा धर्म” ही भावना प्रत्यक्षात अनुभवायला मिळत असून, साकीब गोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

