ठाणे| येत्या गुरुवार, 4 डिसेंबर रोजी श्रीदत्तजयंतीच्या दिवशी, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात रात्रभर सुपरमूनचे दर्शन होणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.


या विषयी अधिक माहिती देताना श्री.दा.कृ.सोमण म्हणाले की, चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लक्ष 84 हजार कि.मीटर अंतरावर असतो. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या 3 लक्ष56 हजार 962 कि.मीटर अंतरावर येणार आहे. त्यामुळे त्या रात्री चंद्रबिंब 14 टक्के मोठे आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसेल. संपूर्ण भारतातून साध्या डोळ्यांनी आपणासर्वांस सुपरमूनचे दर्शन घेता येईल.


गुरूवार 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी पूर्वेस सुपरमून उगवेल आणि रात्रभर आपणास दर्शन देऊन. सकाळी 7 वाजून 14 मिनिटांनी पश्चिमेस मावळेल. यानंतर पुन्हा सुपरमून दर्शनाचा योग पुढल्यावर्षी 24 डिसेंबर 2026 रोजी येणार असल्याचे श्री.दा.कृ.सोमण यांनी सांगितले.




