भारतीय संस्कृतीत धार्मिक पर्यटनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रद्धा, निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म यांचा संगम जिथे घडतो, ती स्थळे केवळ देवदर्शनापुरती मर्यादित न राहता पर्यटनाचे प्रभावी केंद्र ठरतात. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील लघुळ येथील दास मारुती मंदिर हे असेच एक आगळेवेगळे आणि दुर्मिळ धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात आहे.


दास मारुती : दुर्मिळ संकल्पना – महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी वीर मारुती किंवा दक्षिणमुखी मारुतीची मंदिरे आढळतात. मात्र दास मारुतीच्या मूर्ती अत्यंत मर्यादित आहेत. दास मारुती ही केवळ शक्तीची नव्हे, तर रामभक्ती, सेवाभाव, नम्रता आणि समर्पणाची मूर्ती मानली जाते.

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे गोविंदराज स्वामी मंदिरासमोर असलेला मारुती हा दास मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. याच परंपरेतील, तितक्याच श्रद्धेने पूजिला जाणारा दास मारुती नांदेड जिल्ह्यातील लघुळ येथे विराजमान आहे, ही बाब धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते.


स्वयंभू मूर्तीचे आध्यात्मिक आकर्षण – लघुळ येथील दास मारुतीची मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. स्थानिक श्रद्धेनुसार, गावातील तलावात ही मूर्ती स्वयंभूपणे प्रगट झाली. मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रकट झालेल्या अशा मूर्तींना भाविक विशेष महत्त्व देतात. त्यामुळे हे ठिकाण केवळ दर्शनाचेच नव्हे, तर आध्यात्मिक अनुभूतीचे केंद्र बनले आहे.

निसर्गरम्य आणि शांत परिसर – या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिर परिसरात कोणतीही वस्ती नाही. बिलोली आणि लघुळ या दोन गावांच्या मधोमध, शांत आणि निर्जन परिसरात हे मंदिर स्थित आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना मानसिक शांती, ध्यान आणि भक्तीचा अनुभव मिळतो. हे वैशिष्ट्य धार्मिक पर्यटनासाठी अत्यंत पूरक ठरते.
राज्याबाहेरील भाविकांची उपस्थिती – लघुळ येथील दास मारुती मंदिरात दर शनिवारी महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांतून मोठ्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे हे मंदिर स्थानिक मर्यादेत न राहता आंतरराज्य धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे.
धार्मिक उपक्रमांची परंपरा – मंदिरात नित्य सकाळ-संध्याकाळ आरती, नियमित अभिषेक, धार्मिक यात्रा, तसेच पशुप्रदर्शनासारखे उपक्रम मोठ्या श्रद्धेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले जातात. या उपक्रमांमुळे भाविकांचा सहभाग वाढतो आणि पर्यटनालाही चालना मिळते.
आदर्श व्यवस्थापन – या मंदिराच्या धार्मिक संस्थेचे नियोजन व व्यवस्थापन बिलोली येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे निवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ नागरिक शामराव इनामदार आणि त्यांचे चिरंजीव विनोद इनामदार हे सेवाभावाने करत आहेत. कोणताही व्यापारी उद्देश न ठेवता, भक्ती आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून हे देवस्थान जपले जात आहे, ही बाब धार्मिक पर्यटनासाठी आदर्श ठरते.
धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर लघुळ – स्वयंभू दास मारुती, दुर्मिळ मूर्ती, शांत परिसर, आंतरराज्य भाविकांची उपस्थिती आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन या सर्व बाबी लक्षात घेता लघुळ येथील दास मारुती मंदिर हे धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर विशेष स्थान मिळवण्यास पात्र आहे. योग्य प्रसिद्धी, मूलभूत सुविधा आणि पर्यटनदृष्टीने नियोजन केल्यास हे स्थळ भविष्यात मराठवाड्यातील महत्त्वाचे धार्मिक पर्यटन केंद्र ठरू शकते, यात शंका नाही.
लेखक – गोविंद मुंडकर, बिलोली. ८३२९०९५३०३

