Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

IMG 1134 Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

भारतवर्ष ही केवळ भौगोलिक सीमा नाही; ती सनातन संस्कृतीची जिवंत परंपरा आहे. हजारो वर्षांच्या आध्यात्मिक साधना, वेदपरंपरा आणि धर्माधिष्ठित जीवनमूल्यांनी या भूमीला “विश्वगुरू” बनविले. या संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी उभ्या राहिलेल्या पंचजगद्गुरू पीठांना विशेष स्थान आहे रंभापुरी, उज्जैनी, हिमवत् केदार, श्रीशैल आणि काशी. यापैकी उत्तराखंडच्या देवभूमीत वसलेले हिमवत् केदार वैराग्यपीठ, उखीमठ हे अद्वितीय आध्यात्मिक केंद्र आहे. या पीठाचे वर्तमान सिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी हे धर्म, संस्कृती आणि मानवकल्याणाच्या अखंड प्रवासाचे तेजस्वी दीपस्तंभ आहेत.

जन्मसंस्कार आणि वेदाध्ययन  – कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील हुविनहळ्ळी या पवित्र भूमीत महास्वामीजींचा जन्म झाला. वडील वेदमूर्ती राचोटय्या आणि माता संगन्नबसम्मा यांच्या धार्मिक वातावरणात बालसंस्कार घडले. प्राथमिक शिक्षण जन्मगावी, तर पुढील शिक्षण सोलापूर येथील राजेंद्र शिवाचार्य वीरशैव गुरुकुलात झाले. लौकिक शिक्षणासोबत संस्कृत, वेद, ज्योतिष आणि धर्मशास्त्र यांचा अभ्यास त्यांनी प्रगाढतेने केला. वेदमूर्ती पंडित गंगाधरशास्त्रींकडून वेदाभ्यास, तसेच काशी येथे योगतंत्र शिक्षण पूर्ण करून त्यांनी साधनेचा विस्तार केला.

IMG 0884 scaled Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
क्षणसाक्षी छायाचित्रकार – विजय होकर्णे

सोळाव्या वर्षी मठाधीश
वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी नांदेड जिल्ह्यातील शिराढोण येथील भीमाशंकर मठ संस्थानाचा पट्टाभिषेक झाला. अल्पवयात लाभलेले हे दैवी उत्तरदायित्व त्यांच्या असामान्य आध्यात्मिक सामर्थ्याचे द्योतक आहे.
नांदेडमधील भीमाशंकर नगराची स्थापना, दशमुखाश्रम उभारणी, शिक्षणसंस्था निर्माण — ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रारंभिक पावले ठरली.

३२४ वे केदारनाथ रावल
१३ ऑक्टोबर २००० रोजी पंचपीठाधीश्वरांच्या सान्निध्यात महास्वामीजींचा ३२४ वा केदारनाथ रावल म्हणून पट्टाभिषेक संपन्न झाला. “रावल” म्हणजे राजगुरू. केदारनाथ मंदिराचे द्वार अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांच्या हस्ते उघडले जाते आणि कार्तिक शुद्ध द्वितीयेला त्यांच्या हस्ते बंद केले जाते. त्या सहा महिन्यांच्या कालखंडात अखंड ज्योती तेवत राहते. ती ज्योती म्हणजे धर्माची अखंडता. रुद्रप्रयागातील केदारनाथ पीठाची परंपरा हिमालयीन आपत्तीतही अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. श्रद्धा आणि परंपरेचा दीप कधी विझू दिला नाही.

IMG 8221 Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

पट्टाभिषेकानंतरच्या २५ वर्षांच्या तपश्चर्येच्या काळात केदारनाथ येथे रावल केदार जगद्गुरू यांच्या दिव्य सानिध्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, उद्योगपती यांच्यासह लाखो भाविकांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

समाजकार्य आणि धर्मरक्षण
उखीमठ येथे निलकंठभवन यात्रीनिवास, तुळजापूर येथे वैराग्यधाम, बंगळुरूमध्ये जगद्गुरू घंटाकर्ण भवन, बळ्लारी येथे वैराग्यधाम, चाकूर येथे गुरुलिंग आश्रम या सर्व धर्मस्थळांनी त्यांच्या कार्याचा विस्तार दर्शविला.
शिक्षण क्षेत्रात जगद्गुरू पंचाचार्य हायस्कूल, हम्पाय्या स्वामी प्राथमिक शाळा यांसारख्या संस्था उभारून संस्कृती संवर्धनाचे कार्य केले. रुद्रप्रयाग-उखीमठ येथील वैराग्यपीठाच्या शीलामंदिराच्या जीर्णोद्धारालाही त्यांनी प्रारंभ केला.

DXRM9958 Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
क्षणसाक्षी छायाचित्रकार विजय होकर्णे

रजत महोत्सव : तपश्चर्येचा गौरव
सन २००० ते २०२५ — पंचवीस वर्षांचा तपोमय प्रवास. पट्टाभिषेक रजत महोत्सव आणि विश्वशांती महायज्ञ हा त्याच तपश्चर्येचा गौरव सोहळा आहे. हा उत्सव केवळ भव्यतेचा नाही; तो मानवकल्याणाच्या संकल्पनेचा आहे.

क्षणसाक्षी म्हणून माझा अनुभव
मागील चार दशकांहून अधिक काळ मला आणि आमच्या होकर्णे बंधूंना — विजय, भारत, महेश — त्यांच्या दिव्य सानिध्यातील ऐतिहासिक क्षण छायाचित्रित करण्याचे सौभाग्य लाभले. शिवाचार्य ते जगद्गुरू या त्यांच्या प्रवासावर आधारित माहितीपट निर्मिती ही माझ्यासाठी भक्तिभावाची सेवा आहे. आजही त्यांच्या हृदयात धर्म, संस्कृती, शांती आणि मानवकल्याणाची ज्योत तेवत आहे — केदारनाथातील अखंड ज्योतीप्रमाणेच.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top