हिमायतनगर, अनिल मादसवार| “राष्ट्रवादी काँग्रेस ही सर्वसमावेशक, शिव–फुले–शाहू–आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित आणि सर्व धर्म, जातींना समान न्याय देणारी पार्टी आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांची आम्हाला पुरेपूर जाणीव आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत आपण राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या. जे २५ वर्षांत झाले नाही, ते आम्ही फक्त पाच वर्षांत करून दाखवू,” असे प्रतिपादन अजित पवार गटाचे नेते लोह कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर (MLA Prataprao Patil Chikhlikar) यांनी केले.


मंगळवार, दि. २५ रोजी हिमायतनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या मंचावर माजी आमदार अविनाश घाटे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक लूटे, तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर, मागासवर्गीय सेलचे सखाराम वाघमारे, एकनाथ जाधव, म. जुनैद अ. गण्णी, अमोल धुमाळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.


या मंचावरून पुढे बोलताना आमदार चिखलीकरांनी विरोधकांवर पलटवार करताना स्पष्ट केले की “पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात असा काहींचा समज चुकीचा आहे. घोटाळ्यांतून पैसा कमावणारे नेते आज पुन्हा जनतेला भुलवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आदर्शसारख्या घोटाळ्यात नाव आलेले काही नेते येथे येऊन भुलथापा देत आहेत,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांना लगावला.



पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे सोपवा. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म. जावीद अ. गण्णी यांच्यासह सर्वच्या सर्व जागा प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म. जावीद अ. गण्णी यांनी केले. “हिमायतनगरकरांच्या सेवेसाठी आम्हाला एक संधी द्या; शहराच्या विकासाची नवी दिशा आम्ही देऊ,” असे ते म्हणाले. यावेळी सभेला मोठ्या संख्येने महिला पुरुष मतदार बांधव, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
