नागपूर/नांदेड/हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी बातमी समोर आली असून, हिमायतनगर शहराला तालुक्याचा दर्जा मिळूनही साठ वर्षांपासून बसस्थानकापासून वंचित ठेवले गेले. हा अन्याय अनेकांनी पाहिला, पण तो मांडण्याची राजकीय इच्छाशक्ती मात्र प्रथमच आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी दाखवली. यामुळे हिमायतनगर बसस्थानकाचा प्रश्न अखेर सुटण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.


आजवर केंद्रीय राज्यमंत्री, माजी खासदार, विद्यमान खासदार, माजी आमदार यांना हिमायतनगरने संधी दिल्या. परंतु साधे बसस्थानकही शहराला मिळाले नाही हा कटू पण वास्तव प्रश्न आहे. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिमायतनगर बसस्थानकासह शेतकरी, पीकविमा, आरोग्य व इतर मूलभूत प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडत सभागृहाचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी सभागृहात अधिकृतपणे न मांडलेला हिमायतनगर बसस्थानकाचा प्रश्न प्रथमच आ. कोहळीकर यांनी उपस्थित केल्याने हिमायतनगरवासीयांतून त्यांचे कौतुक होत आहे.

रात्री १ वाजेपर्यंत ठाम भूमिका
हिवाळी अधिवेशनात आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी रात्री १ वाजेपर्यंत सभागृहात ठाण मांडत शेतकऱ्यांचा पीकविमा, आरोग्य सेवा आणि हदगाव हिमायतनगर शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. हिमायतनगर शहराला आजवर स्वतंत्र बसस्थानक नाही त्यामुळे उन्हात भाजत, पावसात भिजत बसची वाट पाहावी लागते ही गंभीर बाब असल्याचा प्रश्न तारांकित करून सरकारचे लक्ष वेधून हा केवळ प्रश्न नव्हता, तो हिमायतनगरच्या जनतेचा आवाज होता हे दाखवून दिले.


‘जागा नाही’ हा गैरसमज – आ. कोहळीकरांचा ठोस मुद्दा
बसस्थानकासाठी जागा उपलब्ध नाही, हा आजवरचा युक्तिवाद फोल ठरवत आ. कोहळीकर यांनी स्पष्ट केले की, “हिमायतनगर शहर व परिसरात अनेक शासकीय कार्यालयांच्या जुन्या, वापरात नसलेल्या इमारती पडून आहेत. त्या जागा खुल्या केल्यास बसस्थानक उभारणे सहज शक्य आहे. मात्र याकडे आजवर कुणीच गांभीर्याने लक्ष दिले नाही.”

तालुक्याचा दर्जा, पण बसस्थानक नाही!
हिमायतनगरला तालुक्याचा दर्जा मिळूनही आजपर्यंत बसस्थानक न झाल्याने प्रवाशांना श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात उन्हाळ्यात कडक उन्हात पावसाळ्यात उघड्यावर पावसात भिजत एसटी बसची वाट पाहावी लागत आहे. ही स्थिती शहराच्या विकासाला मारक असल्याचे स्पष्ट चित्र अधिवेशनात मांडण्यात आले.
पूर्वीचा पाठपुरावा आणि आताची निर्णायक पायरी
आ. बाबुराव कदम कोहळीकर यांनी यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री, परिवहन विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार करून बसस्थानकाचा प्रश्न मांडला होता. तसेच तत्कालीन खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी हिमायतनगर लगत असलेल्या इरिगेशन विभागाच्या जमिनीची पाहणी करून बसस्थानकासाठी जागा वर्ग करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. आता आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नागपूर अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधल्यामुळे हा प्रश्न प्रत्यक्ष मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.
नव्या नेतृत्वाकडून विकासाला गती
हिमायतनगर–हदगाव मतदार संघातील जनतेने नव्या चेहऱ्यावर विश्वास टाकत आ. बाबुराव कदम कोहळीकर यांना विधानसभेत पाठवले. त्यानंतर दोन्ही तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला असून, बसस्थानकाचा प्रश्न हा त्याचा ठळक पुरावा ठरत आहे.
हिमायतनगर वासीयांना आशेचा किरण; सरकारची जबाबदारी
साठ वर्षांपासून रखडलेला प्रश्न विधानसभेच्या सभागृहात आमदाराने ठामपणे प्रश्न मांडला आहे. आता तरी हिमायतनगरला हक्काचे बसस्थानक मिळेल, अशी आशा नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत सरकारने निर्णय घ्यायलाच हवा. हिमायतनगरला आता आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष बसस्थानक हवे आहे. अशी जनतेची अपेक्षा आहे. शहर विकासाच्या दृष्टीने ही बातमी हिमायतनगरसाठी मैलाचा दगड ठरण्याची चिन्हे आहेत.

