नांदेड| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावर त्यांचा प्रतिनिधी म्हणून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आजचा दौरा आहे. मी प्रत्यक्ष पाहणी केली असता नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. आपण स्वत: शेतकरी पुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची जाणीव असून सर्व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळेल, असे आश्वासन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे केले.
नांदेड तालुक्यातील आलेगाव, निळा या गावाच्या शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली. या भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आसना नदीच्या काठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जमीन खरडून जाणे, पिके वाहून जाणे, रस्ते वाहून जाणे, पुलांचे नुकसान होणे, घराची पडझड होणे अशा पद्धतीचे सगळेच नुकसान या भागात झाले आहे. आज पाहणी दरम्यान शेकडो शेतकरी मंत्र्यांसोबत शेत दाखवायला, नुकसान दाखवायला उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यामध्ये 4 लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचा प्रचंड जोर होता, नदी-नाले तुडुंब वाहत होते. त्यामुळे परिसरातील शंभर टक्के पीक बुडाले आहे. अंतिम पंचनामे झाल्यावर नेमकी आकडेवारी पुढे येईल. पूर्ण पंचनामे झाल्यावरच नेमके किती नुकसान झाले हे ठरवता येईल, असे सांगितले.
शेतकऱ्यांना 446 कोटींचे वाटप
सन 2023 मध्ये झालेल्या नुकसानापोटी नांदेड जिल्ह्यामध्ये 5 लक्ष 82 हजार 126 शेतकऱ्यांना 446 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. केवळ 10 हजार शेतकऱ्यांनी आपले बँकखाते अपूर्ण ठेवल्याने केवायसी न केल्याने वाटप प्रलंबित आहे. मात्र शेतकऱ्यांचे खाते व्यवस्थित करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांना ही रक्कम मिळेल. शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. तातडीने यावर्षीची रक्कमही त्यांच्या खात्यात वळती करण्यासाठी पंचनाम्याची गती वाढवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, नांदेड मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अजय दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये झालेली जिवीत हानी, जनावरांचे नुकसान, घराची पडझड याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बॅकवॉटरमुळे अनेक ठिकाणी विपरीत परिस्थिती निर्माण होते. जिल्ह्यातील प्रकल्पांच्या बॅकवॉटरच्या संदर्भात मुंबई मंत्रालयात जलसंपदा विभागासोबत बैठक लावण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी आपत्ती सौम्यीकरण प्रस्ताव मांडला व त्याला मंजुरी देण्याची मागणी केली. तसेच राज्य आपत्कालीन राखीव दलाच्या तुकडीचे मुक्कामाचे ठिकाण धुळे ऐवजी हिंगोली येथे करण्यात यावे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळू शकते, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
वीजपुरवठा कंपनीचे जवळपास 205 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे यावेळी अभियंत्यांनी स्पष्ट केले. मात्र आज 6 दिवस अतिवृष्टीला झाले असल्यामुळे प्रत्येक गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, गावनिहाय याबाबत खातरजमा करण्यात यावी, असेही यावेळी मंत्री महोदयांनी निर्देश दिले.भविष्यात दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्याची व पीक पद्धती मध्ये बदल करावा लागेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.