हिमायतनगर,अनिल मादसवार| तन-मन, धन से सदा सुखी हो भारत देश हमारा या उद्देशाला साध्य करण्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यतिथी निमीत्त बाल सुसंस्कार शिबीर सप्ताहांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरात भजन, किर्तन सामुदायिक ध्यान, प्राणायाम, योग्य, बौद्धिक सत्र यासह विविध कार्यक्रम संपन्न झाले. आज रविवारी शहरातील मुख्य रस्त्याने रामधून रैली काढून बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप करण्यात आला आहे.
बाल वयातच मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी बालसंस्कार शिबीर घेण्यात आले असून, विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनविणे, त्यांचे आत्मबल मनोबल वाढवून, आई-वडील, शिक्षक, अतिथी तसेच देश आदी विषयक आदर निर्माण करणे, मूल्यशिक्षणातुन संस्कार, नैतिकता व चारित्र्याचे संवर्धन करणे हे महत्वपूर्ण कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मागील पाच वर्षांपासून बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून सुरु आहे. रविवारी या शिबिराचा समारोप शहरातील मुख्य रस्त्याने रामधून रॅली काढण्यात येऊन करण्यात आला. या शिबिरात लहान मुलं, मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे संस्थापक गोपाळ महाराज मुरझळेकर, विठ्ठल देशमवाड, परमेश्वर इंगळे, गोविंद कदम आदींसह शिबिरार्थी चिमुकले विद्यार्थी व अनेकांची उपस्थिती होती.
प्रत्येक बालकामध्ये ईश्वराची शक्ती आहे, कुणात गुरु शंकराचार्य, कुणात स्वामी समर्थ, कुणात छत्रपती शिवाजी महाराजा, कुणात छत्रपती संभाजी महाराज, कुणात गौतम बुद्ध, कुणात भगवान महावीर, कुणात विवेकानंद, कुणात बाबासाहेब आंबेडकर आणि काहींमध्ये पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे. त्यां विद्यार्थ्यंना योग्य दिशा देण्याची गरज असून, बालसंस्कार केंद्रातील मुले हुशार व्हावीत आणि यातून देशाचे उज्वल भविष्य घडेल. असे मत गुरुदेव सेवा मंडळाचे संस्थापक गोपाळ महाराज मुरझळेकर यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
बाल संस्कार केंद्रातून विद्यार्थी सर्वगुण संपन्न व समाजशील घडावेत म्हणून विविध कला, क्रीडा, कौशल्य विकास, स्तोत्र मंत्रांचे पठण, प्रार्थना, ध्यान, योग, विज्ञान ऋषीमुनींनी केलेल्या संशोधना विषयी जागृती, सुसंकल्प करणे असे विविध उपक्रम गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षपासून विनामुल्य मार्गदर्शन व ज्ञान शिबीर घेऊन सेवा करतात.