नांदेड| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील वन विभागाच्या सारखणी भागातील वडोलीच्या जंगलात हनुमान मंदिरापासून जवळपास 300 मीटर अंतरावर असेलल्या रस्त्यावर रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रीला बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन बिबट्या जागेवरच गतप्राण झाला होता. बिबया मयत झाल्याचे समजताच बघण्याची गर्दी केलेल्या अनेकांनी बिबट्या जवळ छायाचित्र काढले होते. काही जागरूक नागरिकांनी याची माहिती वनविभागाला दिली होती. परंतु वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे कर्मचारी खूप उशिरा घटनास्थळी पोहोचले त्यावेळी घटनास्थळी मृतावस्थेत पडलेल्या बिबट्या गायब झाल्याचे समोर आले आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड व त्यांची सर्व टीम 27 ऑक्टोबर पासून आजपर्यंत म्हणजेच सोळा दिवसापासून बिबट्याच्या शोधात आहेत. पण अजूनही गाढ झोपेत असलेला वन विभागाला बिबट्याचा शोधण्यात यश आले नाही.घटनेच्या दिवशीपासून तीन दिवस जंगलात ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा शोधाशोध केला गेला. त्यांना बिबट्याचा कुठलाही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड व त्यांच्या सोबतच्या कर्मचाऱ्यावर “गेला बिबट्या कुणीकडे” म्हणण्याची वेळ आज आली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद राठोड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दीला नाही. त्यामुळे सहाय्यक वनसंरक्षक गणेश गिरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता, त्यांनी मृत बिबट्या घटनास्थळावरून जंगलात पळून गेल्याचा अंदाज व्यक्त केला होता. खरोखरच हि प्रतिक्रिया अगदी हसण्यासारखी आहे. खरंच मृत बिबट्याला पाय फुटले की कोणती दैवी शक्ती त्याच्यात अवतरली असावी आणि तो पळून गेला असावा असा अंदाज बांधणे सुध्दा कठीण झाले आहे.
वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावून त्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. परंतु हा बिबट्या मृतअवस्थेत होता का जिवंत होता याचा शोध लागणे सुद्धा वन विभागाला अवघड बनले आहे. त्यामुळे “शोधू कुठे मी बिबट्या तुला” असे म्हणण्याची वेळ आता वन विभागावर आली आहे. याबाबत परिसरातील गावकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली असता, बिबट्याच्या मृत शवाची चोरी झाल्याचा ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे. खरेच बिबट्या मृत होता का जिवंत होता हा एक संशोधनाचा विषय आता वनविभागासाठी बनला आहे.
भरधाव वाहनाने बिबट्याला धडक दिल्यामुळे त्याच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्त स्त्राव झाला आणि त्याचे शरीर सुन्न पडले होते. अशा परिस्थितीत बिबट्या पळून कसा जाऊ शकतो. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बिबट्याला योग्य वेळी मदत मिळाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता. वन विभागाचे कर्मचारी अधिकारी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी न आल्यामुळे अज्ञात इसमाकडून बिबट्याच्या मृत शवाची चोरी झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पृथ्वीतलावर सर्वाधिक तस्करीच्या विळख्यात आणि धोक्यात आलेले सस्तन प्राणी असलेले बिबट्या आणि पॅगोलिनच्या (खवले मांजर) शरीराचे अवयव किमान 88 पारंपारिक चिनी औषधांमध्ये घटक म्हणून वापरले जातात, असे लंडनस्थित पर्यावरण अन्वेषण संस्थेने (EIA) केलेल्या तपासणीत आढळून आले आहे. अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिबट्याच्या अवयवांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. किंमत चांगली मिळते. बिबट्याची शिकार करून तस्करी केली जाते. म्हणूनच अज्ञात इसमाकडून बिबट्याच्या मृत शवाची चोरी झाल्याचा ग्रामस्थांनी व्यक्त केलेला संशय खराही ठरु शकतो. गेल्या सोळा दिवसापासून बिबट्याच्या शोधात असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचारी यांना एवढेच म्हणावे लागेल, साहेब शोध मोहीम बंद करा, मृत बिबट्याच्या शवाची चोरी झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला.