हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे सन 1984 मध्ये उभारण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीस तब्बल 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज ही इमारत अतिशय जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून स्लॅब हळूहळू कोसळत असल्याने दवाखान्यात सेवा देणारे डॉक्टर, कर्मचारी तसेच उपचारासाठी येणारे ग्रामस्थ असुरक्षिततेच्या छायेत काम व वावर करत आहेत.


या दवाखान्यातून मंगरूळसह वारंगटाकळी, धानोरा, सिबदरा, वडगाव (ज), वडगाव तांडा (ज), खैरगाव, खैरगाव तांडा, लाईन तांडा आणि गोधन तांडा या गावांना सेवा दिली जाते. मात्र इमारतीच्या जीर्ण अवस्थेमुळे ग्रामस्थ व कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “एखाद्या दिवशी मोठा अनर्थ घडण्याआधीच तातडीने उपाययोजना कराव्यात”, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत मंगरूळ गावचे उपसरपंच तथा नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे श्री. संतोष आंबेकर यांनी “एका महिन्याच्या आत इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून, जीर्ण इमारत पाडून नवी इमारत बांधावी” अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली आहे.


यासंदर्भातील निवेदन पशुसंवर्धन विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांना श्री. ज्ञानेश्वर फड (पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती, हिमायतनगर) यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही, तर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रसंगी गजानन शिरफुले (संचालक, खैरगाव), गजानन कुंजरवाड, गजानन शिंदे यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.


