नांदेड| महात्मा गांधी जयंतीनिमित्त नांदेड विभागात “स्वच्छता दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाने “स्वच्छता ही सेवा (SHS-2025)” या पंधरवडाभर चाललेल्या अभियानाचा समारोप झाला. विभागीय कार्यालयाबरोबरच विविध रेल्वे स्थानके, डेपो आणि अन्य कार्यालयांमध्येही स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात विभागीय कार्यालयात स्वच्छतेची शपथ घेऊन झाली. ही शपथ श्री. प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), नांदेड यांनी दिली. त्यानंतर श्रमदान व स्वाक्षरी अभियान पार पडले, ज्यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.



आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री. प्रदीप कामले यांनी रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व, शाश्वत सवयी व सामूहिक जबाबदारी यावर भर दिला. तसेच पंधरवडाभर चाललेल्या अभियानादरम्यान राबविलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.


या प्रसंगी सफाईमित्रांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर निबंध लेखन, वेस्ट-टू-आर्ट, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.


श्री. आर. के. मीणा, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM), नांदेड यांनी उपस्थित राहून अधिकारी, कर्मचारी, सफाईमित्र व त्यांच्या कुटुंबियांच्या सहभागाचे कौतुक केले. त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन रेल्वे परिसर स्वच्छ, सुरक्षित व प्रवासी अनुकूल ठेवण्यासाठी सतत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
नांदेड विभागातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानके, डेपो व कार्यालयांमध्ये याचप्रमाणे कार्यक्रम पार पडले. प्रवासी व कर्मचारी यांनी शपथ घेतली, श्रमदान केले व सफाईमित्रांचा गौरव केला. स्थानकांवर प्रवाशांना सार्वजनिक सूचना देत स्वच्छतेबाबत सहकार्याची विनंती करण्यात आली तसेच बायो-शौचालयांचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
या स्वच्छता दिनानिमित्त नांदेड विभागाने स्वच्छ भारताच्या संकल्पनेप्रति आपली बांधिलकी अधोरेखित केली. सामूहिक सहभागातून जनजागृती होऊन स्वच्छता ही जीवनशैली बनावी हा संदेश या उपक्रमातून दृढपणे पोहोचविण्यात आला.


