नांदेड, विशेष प्रतिनिधी| नांदेड शहरात उमेदवाराच्या पतीवर झालेला हल्ला हा राजकीय कारणातून झाल्याची चर्चा असताना, पोलीस तपासात सदर घटना राजकीय नसून, दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व भाग्यनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत अवघ्या 12 तासांत गुन्हा उघडकीस आणत सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा त्यात समावेश आहे.


या प्रकरणी पोलीस ठाणे भाग्यनगर, नांदेड येथे गुन्हा क्रमांक 29/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 351(3) तसेच 4/25 भारतीय हत्यार कायदा व 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी शिवाजी गणपत भालेराव (रा. बेलानगर, तरोडा बु., नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 13 जानेवारी 2026 रोजी रात्री साडेसातच्या सुमारास ते मित्राच्या घरासमोर बसले असताना तीन दुचाकींवरून आलेल्या 6 ते 7 अनोळखी इसमांनी तोंडाला रूमाल बांधून खंजर दाखवत धमकी दिली व शेजारी ठेवलेली बॅग जबरदस्तीने चोरून नेली.


पोलिसांची धडाकेबाज कारवाई – घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व भाग्यनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तांबे यांच्या पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे अरुणोदय नगर परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. यात रितेश दिपक पंडित (22), शुभम संजय नरवाडे (19), संघर्ष महेंद्र बगर (19), चांदेश ऊर्फ ओमकार कोंडीबा जाधव (18), वैभव गोपाळ थोरात (19), रोशन ऊर्फ स्कॅनर शंकर कोमार (20) आणि दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे. या घटनेत पोलिसांनी एक लोखंडी खंजर, बजाज पल्सर कंपनीच्या दोन मोटारसायकली, कपडे व 10 हजार रुपये रोख असलेली चोरीची बॅग आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

राजकीय कारण नसल्याचे स्पष्ट
तपासादरम्यान आरोपींनी उमेदवाराचे पती पैसे वाटत असल्याच्या संशयावरून दरोड्याच्या उद्देशाने ही घटना केल्याची कबुली दिली. ही घटना कोणत्याही राजकीय वादातून घडलेली नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखा व भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.

