नांदेड| नायगाव तालुक्यातील कृष्णूर सज्जाचे तलाठी अशोक दिगंबर गिरी (वय 46 वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग, नांदेड येथील पथकाने आज दुपारी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.


तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांच्या नावाने मौजे कृष्णूर येथील गट क्र. 116, 146 व 407 मधील 2 हेक्टर 21 आर शेतीचे वारसाहक्क नोंदणीसाठी तलाठी गिरी यांनी 20,000 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर 09 ऑक्टोबर 2025 रोजी तहसील कार्यालयाजवळ लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी आरोपी तलाठ्याने पंचासमक्ष 10,000 रुपयांवर तडजोड करून रक्कम स्विकारण्यास सहमती दिली, हे निष्पन्न झाले.


यानंतर त्याच दिवशी दुपारी सुमारे 13.42 वाजता, तलाठी कार्यालय नायगाव येथे लाच रक्कम स्वीकारताना आरोपीला ला.प्र.वि. नांदेडच्या पथकाने रंगेहात पकडले. आरोपीकडून 10,000 रुपयांची रक्कम, 1,660 रुपये रोख, आधारकार्ड, पॅनकार्ड व मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.


या प्रकरणी पोलीस ठाणे नायगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक दाखल केली जाणार आहे.


संपूर्ण कारवाई श्री साईप्रकाश चन्ना (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक श्री राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, तर पर्यवेक्षण अधिकारी म्हणून श्री प्रशांत पवार (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड) यांनी कारवाईवर देखरेख ठेवली.


