Myamrathi ; बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी
मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे.तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे,बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला जाऊन मिळते, तशीच मराठी भाषा विविध बोलीभाषांना आपल्या प्रवाहात सामावून घेत समृद्ध झाली आहे.या बोली भाषेतील विविधतेमुळे मराठी भाषेची ताकद वाढली असून तिचे सौंदर्य अधिक खुलले आहे.
बोलीभाषांचे वैविध्य आणि त्यांचे योगदान
महाराष्ट्रात अनेक बोलीभाषा प्रचलित आहेत. वऱ्हाडी, अहिराणी, कोकणी, कोल्हापुरी, मराठवाडी, झाडीबोली, खानदेशी, नागपुरी याशिवाय गोंडी, बंजारा, कोलामी या बोलीभाषांनी मराठी भाषेला बळ दिले आहे. म्हणतात, "दर बारा कोसांवर भाषा बदलते," हे महाराष्ट्राच्या भाषिक वैशिष्ट्यांवर अगदी तंतोतंत लागू होते. या बोलीभाषांमधील साहित्य, लोकसंस्कृती, गाणी, नाटकं, प्रवचनं यांनी ...
