नांदेड| 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात सर्व गावातून स्वच्छ भारत दिवस साजरा केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे. या दिवशी स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये स्वच्छतेची शपथ, श्रमदान, गावे हागणदारीमुक्त करणे तसेच स्वच्छता विषयक उपक्रमांचा समावेश आहे.
दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर स्वच्छता ही सेवा 2024 पंधरवडा राबवला गेला असून, त्याची सांगता 2 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. गावांमध्ये स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छते संदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गावस्तरावर घेण्यात आलेल्या स्वच्छ माझे अंगण स्पर्धेतील पात्र कुटूंबांचा यावेळी सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
याशिवाय, गावांमध्ये स्वच्छतेच्या संदर्भात श्रमदान आणि हागणदारी मुक्तीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी गावांना हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कम्रचारी तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका गावाची जबाबदारी सोपवून, त्या गावात उपक्रम राबवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत. स्चछ भारत दिवस कार्यक्रमासाठी स्थानिक लोकप्रतिनधींना निमंत्रित करण्याच्या गट विकास अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तरी या उपक्रमात सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिाकरी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, ग्राम पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे व जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.