हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेली सात वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले गोविंद देवकते सर यांच्या बदलीचे आदेश लागताच संपूर्ण गाव स्तब्ध झाले.


शनिवारी नवीन शाळेत रुजू होण्यासाठी देवकते सर शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या भोवती गर्दी केली आणि अश्रूंना वाट मोकळी झाली. काही विद्यार्थ्यांनी तर शाळेचे मुख्य गेट बंद करून त्यांना रस्त्यात अडवले. देवकते सरांचा निरोप हा केवळ एक बदलीचा क्षण नव्हता, तर एका सच्च्या ‘गुरू’च्या कार्याची सार्वजनिक दाद होती. आज त्यांचे कार्य इतर शिक्षकांसाठी आदर्शवत ठरत आहे.



शिक्षक-विद्यार्थी नात्याचा भावनिक क्षण…
विद्यार्थ्यांनी गळ्यात गळा घालून रडत असताना देवकते सर स्वतःही डोळे पुसताना दिसले. पालक, ग्रामस्थ आणि सहकारी शिक्षकांच्याही डोळ्यात पाणी आले. उपस्थितांनी सांगितले की — “आजवर अनेक शिक्षक आले-गेले, पण इतक्या प्रेमाने विद्यार्थ्यांच्या मनात घर करणारा शिक्षक दुर्मिळच!”


कोरोना काळात शाळा बंद असतानाही देवकते सरांनी ऑनलाइन तसेच मैदानी पातळीवर शिक्षण सुरू ठेवले. दुसऱ्या लाटेत तर शाळेच्या पटांगणात प्रत्यक्ष वर्गभरवून शिक्षण सुरू ठेवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. “फक्त पगारासाठी काम करणारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी रडणारे शिक्षक यातला फरक आज सर्वांनी पाहिला” – आशी प्रतिक्रिया ग्रामस्थानी व्यक्त केली.



दुधड शाळा आज तालुक्यात अव्वल – कारण फक्त एकच… ‘देवकते सर’ – जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटत असताना दुधड शाळा मात्र आज जवळपास अव्वल क्रमांकावर आहे. शिक्षणपद्धती, शिस्त आणि विद्यार्थ्यांशी संवाद या त्रिसूत्रीमुळे देवकते सर विद्यार्थ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते.

