हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिरात देव शयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधुन ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत ” पंढरीची वारी ” या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम मंदिर सभागृहात दुपारी २ ते ५ वाजेच्या दरम्यान संपन्न झाला. या कार्यक्रमास भाविकांनी व संगीत शौकिनांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
दिनांक १७ बुधवारी आषाढी एकादशीच्या निमित्ताचे स्व. विमलबाई लिंगारेड्डी तिप्पनवार यांच्या 17 व्या पुण्यस्मरण स्मृती प्रित्यर्थ “पंढरीची वारी ” या अभंग वाणीचा विशेष कार्यक्रम गजानन तिप्पनवार, परमेश्वर तिप्पनवार आणि परिवारातर्फे आयोजित करण्यात आला होता. भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या कार्यक्रमांची सुरुवात सेवानिवृत्त मुख्यध्यापक नागनाथ अक्कलवाड सरांच्या हस्ते मातोश्रीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलीत करून झाली. कार्यक्रमाची सुरुवात श्री परमेश्वर तिप्पनवार यांच्या स्वराने..”वारी” तील “पंचपदिच्या..”जय जय राम कृष्ण हरी ” च्या गजराने झाली.
गायक कलाकार म्हणून नांदेडचे श्री कालिदास चौधरी, माधुरी ताई जाधव यांनी त्यांच्या सुमधुर आवाजातून विविध भक्ती रचना सादर केल्या. निवेदन श्री त्रिंबक मगरे ह्यांनी आपल्या मधुर वाणीतून अभंगवाणीचा सारांश आणि विवेचन करून वातावरण भक्तिमय केलं. आणि उपस्थित भाविकांची मने जिंकून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. संगीतमय कार्यक्रमाच्या आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी धावती भेट देऊन मातोश्रीच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक अमोल भागात, कृउबाचे सभापती जनार्धन तांडवाड, तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी आदींसह अनेकांची उपस्थिती होती. दरम्यान मंदिर कमिटीच्या सदस्यांसह हजारो भाविकांनी उपस्थित होऊन “पंढरीची वारी ” या अभंग वाणीचा लाभ घेतला.