नांदेड| राष्ट्रीय सेवा योजनेतून समाज उपयोगी कामे करावीत, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. दि. ४ सप्टेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय सेवा योजना’ कार्यक्रमाधिकारी यांच्या वार्षिक नियोजन बैठक व ‘माय भारत पोर्टल’ नोंदणी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. जी. एस. गायकवाड, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, वित्त व लेखा अधिकारी मो.अब्दुल शकील अब्दुल. करीम, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रमाधिकारी हा २४ तास समाजासाठी कार्य करणारा असतो. तो महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक जवळचा व जिव्हाळ्याचा असतो. खऱ्या अर्थाने देशातील पीढिला सामाजिक उपक्रमासाठी तयार करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रमाधिकारी करत असतात. प्रत्येक कार्यक्रमाधिकाऱ्याने आपल्या कार्याचे नियोजित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य केल्यास यशस्वीपणे कार्यपूर्ती करता येते.
याप्रसंगी डॉ. जी. एम. गायकवाड बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकाऱ्यांनी सातत्याने नव-नवे उपक्रम राबवून आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श उभा केला पाहिजे. समाजात समाज उपयोगी, विविध उपक्रम राबवत असताना आपली ओळख समाजामध्ये निर्माण करून देण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी आपल्या कार्यातून करत असतात. त्याबद्दल त्यांनी कार्यक्रम अधिकारीचे अभिनंदन केले.
दुपारच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकाऱ्यांसाठी ‘माय भारत पोर्टल’ नोंदणी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत माय भारत पोर्टलवर महाविद्यालय, कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवक या सर्वांची नोंदणी कशी करावी यासंबंधीचे मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण पूर्ण केलेले डॉ. केशव अलगुले आणि डॉ. तुकाराम फिसफिसे यांनी मार्गदर्शन केले. ही प्रक्रिया २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असून एका पोर्टलवर सर्व उपक्रमाची नोंद येते. स्वयंसेवकाची नोंदणी करून त्यांना अनुभवात्मक शिक्षण (ईएलपी) दिल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन नोकरीची संधी व फायदा होऊ शकतो. त्यातून त्यांच्या कार्याची नोंद प्रोफाइलच्या माध्यमातून देश पातळीवर होते. यासाठी प्रत्येक कार्यक्रमाधिकाऱ्याने ‘माय भारत पोर्टलवर’ नोंदणी करणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात मुंबई येथील महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्यावतीने उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार डॉ. केशव आलगुले, व उत्कृष्ट स्वयंसेवक संदीप कळासरे यांना जाहीर झाल्याबद्दल कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेस विद्यापीठ कार्यक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मल्लिकार्जुन करजगी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. भागवत पस्तापुरे यांनी तर आभार डॉ. अमोल काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, ए.आय. शेख, तुकाराम हंबर्डे, संदीप कळासरे, अविनाश ततोड, यश घुले व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.