हिमायतनगर, अनिल मादसवार| आज दिनांक 05 नोव्हेंबर 2025 रोजी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे हिमायतनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज व इच्छुकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्ष कुणाल भाऊ राठोड यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे.


हिमायतनगर शहरातील बालाजी विद्यालयात आयोजित मुलखती कार्यक्रमास तालुकाभरातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संभाव्य उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्ष संघटनेचे बळ वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची मशाल पुन्हा तेजोमय करण्यासाठी एकदिलाने प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.


यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल भाऊ राठोड यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून आपला अर्ज दाखल केला, तर नगरसेवक पदासाठी देखील अनेक कार्यकर्त्यांनी उत्साहाने अर्ज सादर केले. तसेच राठोड यांच्या नेतृत्वाखाली अनेक इच्छुकांनी आपले नगरसेवकी पदासाठी अर्ज देऊन उमेदवारी मागितली आहे. खासदार आष्टीकर यांनी घेतलेल्या मुलखाती बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आणि आत्मविश्वास दिसून आला.


खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थित सर्वांना संबोधित करताना सांगितले की, “शिवसेनेच्या विचारधारेवर श्रद्धा ठेवणारे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक यांनी एकत्र येऊन येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला भक्कम विजय मिळवून द्यावा. विकासाभिमुख कार्यपद्धती, जनतेशी असलेले थेट नाते आणि प्रामाणिक नेतृत्व हेच शिवसेनेचे बळ आहे.”


बैठकीत नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या तिन्ही स्तरांवरील निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात आली. प्रत्येक विभागात पक्ष संघटनेचे जाळे अधिक मजबूत करण्याचे, मतदारसंघ निहाय समन्वय समित्या स्थापन करण्याचे आणि घराघरात शिवसेनेचा प्रचार नेण्याचे ठरविण्यात आले.
शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “नगरपंचायत निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विकासाच्या दृष्टीने जबाबदारीची निवडणूक आहे. आमचा उद्देश नागरिकांच्या विश्वासाला उतरून हिमायतनगरचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे.” कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने घोषणा दिली. “येत्या निवडणुकीत शिवसेनेची मशाल धगधगणारच!” यावेळी शेकडो इच्छुक, कार्यकर्ते उपस्थित होते.


