मांजरम/नरसी/कुंटूर/बरबडा/नायगांव बा./नांदेड l गत काही दिवसातील दोनवेळच्या अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट व विशेष पॅकेजद्वारे तातडीची आर्थिक मदत देणेसह जनसामान्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजितदादा पवार व संबंधित विभागाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने करण्यात आली असून याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नायगांवच्या तहसील कार्यालयासमोर दि.४ सप्टेंबर रोजी धरणे व निदर्शने करण्यात येणार असल्याने अतिवृष्टीग्रस्तांसह सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.


सविस्तर माहिती अशी की, गत काही दिवसांत दोनवेळा नायगांव तालुक्यासह जिल्हाभरात मोठ्या प्रमाणाची अतिवृष्टी व सद्याच्या संततधार पावसामूळे नायगांव (खै) सह नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह पिडीतांना सरसकट व विशेष पॅकेजद्वारे तातडीची नुकसानभरपाई मिळणेसह जनसामान्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत.

नाली,नद्या लगतच्या तसेच, अन्य शेतीपिक,बहुतांश गांवात सर्वत्र पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांसह अन्य नुकसान झालेले आहे.त्यांना तातडीची मदत देण्याची गरज असतांना आजपावेतो कोणतीच कार्यवाही झाली नाही.त्यातच, दि.२८ व २९ ऑगस्ट रोजी पूनश्च अतिवृष्टी व सद्या संततधार पाऊस सुरुच असून अद्यापही शासनस्तरावरून योग्यतेने कार्यवाही नाही. त्यामूळे या प्रकरणात आपण तातडीने लक्ष द्यावे तसेच, नायगांव (खै.) तालुक्यासह संपूर्ण नादेड जिल्हा ओला दुष्काळ जाहिर करावा.


नुकसानग्रस्तांना पश्चिम महाराष्ट्रासाठीचा सन् २०१९ तसेच,दि.१७ नोव्हेंबर २०२२ व दि.१ जानेवारी २०२४ शासननिर्णयांच्या तरतूदीसह विशेष पॅकेज द्यावे.ज्यात- सरसकट हेक्टरी किमान पन्नास हजार व अन्य आर्थिक मदत द्यावी,नदी-नाल्यालगतच्या शेतजमिन खरडलेल्या शेतकऱ्यांना किमान १ लाख रुपये विशेष पॅकेजमधून आर्थिक मदत द्यावी.

अतिवृष्टीत अनेकांची जनावरे मयत झाल्याने या पशुपालकांना तसेच, शेतीतील औजारे,गुरांचे गोठे व अन्य उपकरणे वाहून गेलेल्यांना,नासधूस झालेल्यांना सद्याच्या बाजारमूल्यानुसार आर्थिक मदत देण्यात यावी,घरे पडलेल्यांना वा घरे, घरातील साहित्याची नासधूस झालेल्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यासह तातडीने विनाअट शासनाच्या योजनांतून घरकुले व गुरांचे गोठे तसेच, पशुहानी झालेल्यांना दुभती जनावरे द्यावीत,गत खरिप हंगाम – २०२४ या कालावधीतील शेतकऱ्यांना पीकविम्याची ७५% रक्कम द्यावी.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जमुक्त करावे,शेळगांव – दुगांव रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच,अतिवृष्टीत खचलेल्या पुलाची तातडीने दुरुस्तीसह सदरचे काम दर्जाहिन व संथगतीने करणारे कंत्राटदाराचे नांव व संस्था तातडीने काळ्या यादीत टाकून त्यांची देयके शासनखाती वसुलीसह रद्द करुन त्यांचेसह संबंधित शाखा,उप व कार्यकारी अभियंता यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी,औराळा येथिल स्मशानभूमी शेड बांधकाम, सुशोभीकरण व त्यासाठीचा पांदनरस्ता काम तातडीने पूर्ण करावे,अतिवृष्टीत मांजरम येथिल पाझर तलाव दर्जाहिन कामामूळे फुटल्याने संबंधित कंत्राटदारांकडून सदरची रक्कम शासनखाती वसूल करावी व त्याचे नांव,संस्था काळ्या यादीत टाकावे आणि संबंधितासह नियंत्रित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.या तलावालगतच्या नुकसानग्रस्त, खरडलेल्या जमिनधारक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
बळेगांव बंधारा व गोदावरी नदीपात्राच्या बॅकवाॅटरमूळे त्रस्त पाटोदा (त.ब.),वजीरगांव,बरबडा आदी गांवातील शेतकऱ्यांच्या जमीनी शासनाने ताब्यात घेऊन बाजारमूल्यानुसारच आर्थिक मावेजा द्यावा,कुंचेली जूने गांव,नरसी,नायगांव (बा.) व अन्य गांवात अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, कोकलेगांव येथिल अर्धवट पुल,रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे आदी मागण्या संबंधित विभागाकडे निवेदनातून करण्यात आल्या असून या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर,राष्ट्रवादी किसान सभेचे माजी प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव मा.भवरे, तालुका सरचिटणीस किरण वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान,शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मागण्यांबाबत दि.४ सप्टेंबर रोजी आयोजित नायगाव तहसील कार्यालयासमोरील धरणे व निदर्शने आंदोलनात अतिवृष्टीग्रस्तांसह सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादीचे पांडुरंग शिंदे,लक्ष्मणराव भवरे,किरण वाघमारे, बालाजी कदम कुंटूरकर,संजय पाटील चव्हाण, दिनेश सुर्यवंशी आदींनी केले आहे.

