हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक 16 मध्ये कार्लेकर हॉटेल जवळील नाल्याचे बांधकाम तसेच प्रभागातील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. परिसरात पावसाचे व नाल्याचे पाणी शिरणार नाही याची कायमस्वरूपी सोय करावी. या मागणीसाठी स्थानिक युवकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.


मागील तीन महिन्यांपासून नागरिकांकडून वारंवार तक्रारी व निवेदनं दिली जात असूनही नगरपंचायती कडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. थोडा पाऊस झाला तरी परिसरात पाणी साचून ते थेट घरात घुसते. त्यामुळे घरगुती साहित्याचे नुकसान होऊन नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागतात, अशी माहिती समोर आली आहे.


अतिवृष्टीच्या काळात खासदार नागेश पाटील व नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र नगरपंचायतीने नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.


या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक 16 मधील युवक व नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. प्रभारी मुख्याधिकारी पल्लवी टेमकर यांनी स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली; मात्र “जोपर्यंत रस्ते व नाल्यांच्या समस्या मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील,” असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. उपोषणकर्त्यांमध्ये पत्रकार शेख मुज़म्मिल, म. मकसूद म. इस्माईल, शेख रमजान शेख पाशा, जुबेर पत्रकार,पठाण, अलीम, रमजान यांच्यासह वार्ड क्रमांक 16 मधील अनेक युवक व नागरिकांचा सहभाग आहे.



