नांदेड l प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय दिनांक 18 जून 2024 मधील तरतूद क्रमांक 1.8 मध्ये 1.8.1 ते 1.8.20 चे निकष पूर्ण करत असलेल्या शिक्षकांना बदलीमध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. या प्राधान्यानुसार बदलीमध्ये सर्वात आगोदर युडीआयडीधारक दिव्यांग शिक्षक, जोडीदार, पाल्य गंभीर आजार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटीत व अशा एकूण 20 उपसंवर्गातील निकष पूर्ण करत असलेल्या आणि बदली पोर्टलवर नोंद केलेल्या शिक्षकांना निकषाच्या प्राधान्यातील उतरत्याक्रमाने सेवाजेष्ठतेनुसार शासन निर्णयात बदलीचे प्राधान्य देण्यात आले आहे.


प्राथमिक शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 चे निकष पूर्ण करत होते अशा शिक्षकांना बदलीमध्ये सूट घेण्याकरिता अथवा बदलीचा लाभ घेण्याकरीता प्रथमत: बदली पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असते. सन 2025 च्या बदलीमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 मध्ये सहभाग घेण्याकरिता बदली पोर्टलवर नोंद करण्यासाठी 6 ते 9 जून 2025 या चार दिवसाच्या कालावधीमध्ये संधी देण्यात आली होती.


प्राथमिक शिक्षकांनी संवर्ग 1 चा लाभ घेण्यासाठी नोंद केल्यानंतर ज्या शिक्षकांनी बदलीसाठी होकार अथवा नकार दिलेला आहे अशा शिक्षकांची यादी बदली पोर्टलवर एकमेकांना पाहण्याची सुविधा उपलब्ध होती. तरी सर्व यादी गटस्तरावर प्रसिद्ध करून आक्षेप देण्याबाबत सूचित करण्यात आले. त्यासाठी Appeal To EO आणि त्यानंतर Appeal To CEO ची सुविधा बदली पोर्टवर देण्यात आली होती. त्याप्रमाणे शिक्षकांनी एकमेकावर आक्षेप घेण्यात आलेल्या सुविधेमध्ये दोन शिक्षकांचे अपील आले होते. त्या शिक्षकांचे दोन्ही स्तरावरून अपील निकाली काढण्यात आले.


ऑनलाईन बदली सन 2025 मध्ये एकूण 3 हजार 660 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यापैकी शासन निर्णय सुधारीत 16 जून 2025 च्या निर्णयातील संवर्ग 1 मधील पात्र असलेल्या युडीआयडी UDID धारक 519, गंभीर आजार 170, परित्यक्त्या/घटस्फोटीत 31 अशा एकूण 720 शिक्षकांपैकी गटशिक्षणाधिकारी स्तरावरून जे शिक्षक संवर्ग 1 साठी अपात्र होते अशा 9 शिक्षकांचे नाव समाविष्ट होते. जे बदलीमध्ये सहभागी नसल्याने एकूण 9 शिक्षकांना पडताळणी मधून वगळून एकूण 711 शिक्षकांच्या पडताळणीचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.

या बदली प्रक्रियेमध्ये अनेक शिक्षकांनी, संघटनांनी व बहिस्थ नागरिकांनी या कार्यालयाकडे संवर्ग 1 मध्ये लाभ घेतलेल्या शिक्षकाविरुद्ध अनेक तक्रारी केलेल्या होत्या. त्यासोबतच दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव यांचे 18 सप्टेंबर 2025 रोजी युडीआयडीधारक दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यात यावी असे निर्देश या कार्यालयास प्राप्त झाले.
नांदेड जिल्ह्यातील युडीआयडी UDID धारक व गंभीर आजार असलेल्या शिक्षकांची संख्या खूप मोठी असल्याने सदरील शिक्षक व त्यांच्या पाल्यांना तपासणीसाठी मानसिक व शारीरिक त्रास होवू नये उद्देशाने बदलीचा लाभ घेतलेल्या 711 शिक्षकांची प्राथमिक तपासणी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वैद्यकीय पथकामार्फत करण्यात आली. यामध्ये प्रथम दर्शनी दिव्यांग, गंभीर आजार असलेल्या शिक्षकांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करून सकृतदर्शनी दिव्यांगत्वाबाबत खात्री पटलेल्या शिक्षकांना वगळून इतर दिव्यांगत्वाबाबत, टक्केवारीबाबत साशंकता असलेल्या एकूण 343 शिक्षक, पाल्य, जोडीदार यांना जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी द्वितीय तपासणीसाठी जिल्हा अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे संदर्भित केले.
द्वितीय तपासणीसाठी संदर्भित केलेल्या शिक्षकांची संख्या, जोडीदारांची देखील संख्या मोठी असल्याने व जिल्हा रुग्णालयाकडे तपासणी कामी संबंधित शिक्षकांना त्रास होवू नये म्हणून अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे तज्ज्ञ वैद्यकीय पथक जिल्हा परिषदेकडे पाचारण करून तपासणी करण्यासाठी द्वितीय तपासणीचा कँप आयोजित करण्यात आला. या तपासणीमध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकांनी द्वितीय तपासणीतील एकूण 343 शिक्षकापैकी संवर्ग 1 चा लाभ घेतलेल्या 197 शिक्षकाना उच्च वैद्यकीय तपासणी केंद्राकडे संदर्भित करण्यात आले. तसेच अँजिओप्लास्टी झालेली असताना हृदय शस्त्रक्रिया असे दर्शवून 1.8.3 चा लाभ घेतलेल्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. युडीआयडी प्रमाणपत्र नसताना संवर्ग 1 चा लाभ घेतलेल्या शिक्षकांना युडीआयडी UDID प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम नोटीस देण्यात आली. पडताळणीसाठी अनुपस्थित असलेल्या शिक्षकांना अनुपस्थितीबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
त्यानंतर संदर्भित केलेल्या सर्व शिक्षकांचे युडीआयडी UDID प्रमाणपत्र, सदर प्रमाणपत्र निर्गमित केलेल्या सक्षम यंत्रणेकडे फेरपडताळणीसाठी पाठविण्यात आले. द्वितीय तपासणीमध्ये संदर्भित केलेल्या सर्व 197 शिक्षकांना पाल्य, जोडीदार यांच्या दिव्यांगत्वाची ऑनलाईन बदलीबाबत शासन निर्णयातील तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 14 सप्टेंबर 2018 नुसार दिव्यांगत्वाचा लाभ घेतलेल्या व द्वितीय पडताळणीमध्ये साशंकता आढळून आलेल्या एकूण 197 शिक्षकांना अंतिम तपासणीसाठी जेजे हॉस्पिटल मुंबई व अली यावर जंग नॅशनल इंस्टीटयूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डीसॅबिलीज बांद्रा मुंबई यांच्याकडे पडताळणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्याबाबत पत्र देवून विनंती करण्यात आली, असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे यांनी कळविले आहे.

