नांदेड| आपल्या घरात मुलींचा जन्म झाल्यावर जिलेबी वाटण्यापासून आनंद व्यक्त करायला सुरुवात होते. मुलींच्या बालवयात आई-वडिलांचे तिच्याशी घट्ट नाते असते. तिचा प्रत्येक लाड पुरवण्यात येतो. तिला जवळ घेऊन गोंजरविण्यात येते. तिच्याशी छान-छान मनमोकळ्या गप्पा होतात पण मुलगी दहावी पास झाल्यानंतर, आता आपली मुलगी मोठी झाली म्हणून पालक तिच्याकडे थोडे दुर्लक्ष करतात. यामध्ये पालक आणि मुलींमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. कारण आता ती मोठी झाली तिचे तिला सर्व काही कळते. अशी समजूत पालकांची असते. आणि नंतर याच वयात मुली बाहेरच्या मित्र-मैत्रिणींच्या सानिध्यात येतात. त्यात एखादीला संगत चुकीची लाभली तर ती अत्याचारास बळी पडते म्हणून जरी आपली मुलगी मोठी झाली तरी जसे आपण तिच्याशी लहानपणी जसे वागत होतो तसेच ती मोठी झाल्यावरही वागावे, जेणेकरून ती कोणत्याही अत्याचारास बळी पडणार नाही. नाते दृढ ठेवून मुलींशी नेहमी संवाद ठेवावा. यामुळे मुलीच्या सुरक्षेतेसाठी पालकांनी नेहमी जागरूक असावे, असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते दि. २० सप्टेंबर रोजी विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये आयोजित ‘महिला सुरक्षितता व शिष्यवृत्ती’ या विषयावर एक दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून मनोगत व्यक्त करत होते. याप्रसंगी व्यासपीठावर त्यांच्यासमवेत नांदेड विधी सेवा प्राधिकरणाच्या न्यायाधीश श्रीमती दलजित कौर जज, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरज गुरव, नांदेड उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने, कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे यांची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले आपली मुलगी कोणाच्या सानिध्यात राहते, कुठे जाते, केंव्हा येते, कुणाशी फोनवर किती वेळ बोलते, समाज माध्यमावर किती वेळ असते अशा सर्व बाबीकडे पालकांचे बारकाईने लक्ष असायला हवे, मुलगी चुकत असल्यावर वेळोवेळी तिला चूक लक्षात आणून देऊन समजावून सांगणे, यासारख्या गोष्टी केल्यावर निश्चितच फरक पडतो. यापुढे प्रत्येक महाविद्यालयांमध्ये पालकांना महिन्यातून एकदा बोलावून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित प्राचार्य व प्राध्यापकांना केले.
याप्रसंगी उद्घाटनपर दोन शब्द मांडताना न्यायाधीश दलजित कौर जज म्हणाल्या, बदलापूर, कोलकत्ता यासारख्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याला सर्वस्व जबाबदार हे समाज माध्यमे आहेत. त्यामुळे मुलींनी यापुढे स्वतःच्या सुरक्षेसाठी जे काही करता येईल ते करावे, विधी सेवा प्राधिकरणामार्फत अत्याचारित महिलांना मोफत सल्ला व वकील पुरवण्यात येतो. महिलांच्या सुरक्षेतेसाठी खंडीभर कायदे आहेत पण आपण त्याचा पूर्णपणे वापर करत नाही. म्हणून अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव याप्रसंगी म्हणाले, आपल्याकडील पुरुष प्रधान संस्कृती अत्याचाराचे मूळ कारण आहे. समाज माध्यमांच्या चुकीच्या वापरामुळे पिढी गारद होत आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून सबळ पुरावा मिळवण्यासाठी आमची नेहमी धडपड असते. पण बऱ्याच वेळी सबळ पुराव्याअभावी बलात्कारांच्या बहुतांश खटल्यामध्ये आरोपीस शिक्षा होत नाही याची आम्हाला खंत आहे. काही खटल्यामध्ये पुरावा म्हणून साक्षीदार भेटतात पण नंतर दबावामध्ये येऊन ते फुटतात आणि शेवटी आरोपी शिक्षेअभावी बिनधास्त फिरतात. त्यामुळे मुलींनी धाडसीवृत्ती अंगीकारणे आवश्यक आहे. अन्यायाविरोध प्रतिकार करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संगीता माकोणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, प्रा. डॉ. संगीता माकोणे, स्त्रि-अध्ययन केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. शालिनी कदम, प्रा. डॉ. अर्चना साबळे, प्रा. डॉ. अरविंद सरोदे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, विधी अधिकारी डॉ. विनायक भोसले, सुनील ढाले, संदीप टाकणकर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास संचालक, प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.