नांदेड | राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय, पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई व राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलन पूर्व निवड चाचणी शिबिर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान संपन्न होत आहे.
या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध ५१ विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका सहभागी झाले आहेत. यामध्ये त्यांची शारीरिक चाचणी, मुलाखत, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग यास तेवढेच महत्त्व असते. दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य इंजिनीयर नारायण चौधरी, डॉ. विजय विश्वकर्मा, डॉ. शिवराज शिंदे, डॉ. संदीप काळे, डॉ.सूर्यप्रकाश जाधव, डॉ.सुशील शिंदे, डॉ.रमेश देवकर, डॉ. मलिकार्जुन करजगी, डॉ. डी. डी. पवार यांची उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारात गोंधळ, लावणी, गीत, कोळी गीत, आदिवासी गीत, मराठी गीत, पोतराज, यासारखे विविध कलाप्रकार बहारदार पद्धतीने सादर केले. त्यांच्या कला प्रकारास प्रेक्षकांनी सुद्धा तेवढ्याच उत्साहाने दाद दिली. या कार्यक्रमास परीक्षक म्हणून शासनाच्या वतीने डॉ. विजय विश्वकर्मा, डॉ.शिवराज शिंदे, डॉ. संदीप डोंबे हे उपस्थित होते. तर वेळ निरीक्षक म्हणून डॉ. सच्चिदानंद खडके यांनी कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संदीप काळे यांनी तर आभार डॉ.अलगुले राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक लातूर जिल्हा यांनी मानले.