किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या कैलास टेकडी येथील महादेवाच्या दर्शनासाठी पहिल्या सोमवारी हजारो भावीक भक्तगण महाराष्ट्रासह तेलंगणा राज्यातून दाखल होणार असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळणार आहे. घनदाट अरण्यामध्ये उंच टेकडीवर वसलेल्या या महादेव मंदिराच्या परिसरात अद्याप पर्यंत कुठल्याही शासकीय सुविधा पोहोचू न शकल्याने येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतो.
विशेषता महाराष्ट्र शासनाच्या वतीने कैलास टेकडी या पवित्र स्थळास क दर्जाची मान्यता मिळाली पण अद्याप पर्यंत या ठिकाणी रस्ता पाणी लाईट व निवासाची व्यवस्था या कुठल्याही सुविधा शासनाकडून पोहोचू शकल्या नाहीत. त्याचबरोबर या पवित्र स्थानास आजी-माजी आमदार त्याचबरोबर तेलंगणा राज्याचे बहुतांशी मंत्री सुद्धा श्रद्धास्थान मानतात. या ठिकाणचे मुख्य पुजारी म्हणून परमपूज्य लिंबाजी महाराज दरवर्षी 9 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये वार्षिक उत्सव साजरा करतात त्यानिमित्ताने जवळपास 110 क्विंटल धान्याचा अन्नदानाचा भंडारा याठिकाणी केला जातो.
या श्रद्धास्थानाला भेट देणाऱ्या सर्वच लोक प्रतिनिधींनी येथील लिंबाजी महाराजांना या ठिकाणी सुख सोयी उपलब्ध करून देऊ आश्वासन नेहमीच देतात पण अद्याप पर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी मजबूत रस्ता वीज पाणी व निवासाची व्यवस्था होऊ शकली नसल्यामुळे हे पर्यटन स्थळ क दर्जाचे असताना सुद्धा विकासापासून कोसो दूर वंचित असल्याचे पहावयास मिळत आहे. विविध धर्मातील विविध पंथातील लाखो भक्तजनांचे श्रद्धास्थान असलेल्या कैलास टेकडी या पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास व्हावा अशा स्वरूपाची मागणी या भागातील जनतेकडून व भक्त गणांकडून होत आहे.