नांदेड| संत नामदेव महाराज यांचा कृपा आशीर्वाद लाभलेली नानक साई फाउंडेशनची १० वी घुमान यात्रा नोव्हेंबर महिन्यात पंजाब दौऱ्यावर जाणार आहे. यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून १५ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान यात्रा होणार आहे.
संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासोबतच दोन राज्याना जोडणारा सेतु म्हणून घुमान चळवळ आपली महत्वपुर्ण भूमिका वठवत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमिताने सुरु झालेली ही चळवळ लोकप्रिय ठरली असून ११ हजार भक्तांना संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन टप्याटप्याने घडविण्याचा संकल्प आहे. नानक साई फाऊंडेशनचे चेअरमन तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे मागील १० वर्षापासून आयोजन केले जाते.
घुमान यात्रेच्या माध्यमातून श्रीक्षेत्र घुमान म्हणजे संत नामदेव महाराजांची कर्मभूमी यासह सुवर्ण मंदिर अमृतसर,शक्तीपिठ माता नैनादेवी (हिमाचल प्रदेश),आनंदपूर साहिब,कार्तिकी स्वामी अचलेश्वर धाम,भाकरानंगल डॅम,वाघा-अटारी बॉर्डर, जालियनवाला बाग,महाभारत (धर्मनगरी) कुरुक्षेत्र,माता भद्रकाली,फतेहगड साहिब,बस्सी पठाणा,वीरासते खालसा म्युजियम,लवकुश जन्मस्थळ,परजीया कलान (खेडेगाव) या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घडविले जाते.
यात्रेला उत्सुर्त प्रतिसाद मिळत असून यावर्षी १२७ जणांनी नावं नोंदणी केली आहे. यात्रेला लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांचा कृपाआशीर्वाद प्राप्त आहे. या यात्रेला पंजाब राज्यात विशेष अतिथीचा दर्जा असून यात्रेत सहभागी व्होण्याचे आवाहन नानक साई फाऊंडेशन व संत नामदेव घुमान यात्रा संयोजन समितीच्या (9823260073) वतीने करण्यात आले आहे.