नांदेड। गेल्या अनेक महिण्यापासूनची प्रतीक्षा संपणार असून, जून महिन्यात नागपूर, पुणे विमानसेवेला प्रारंभ होतो आहे. नांदेड शहर देशातील सात शहराच्या विमानसेवेशी जोडले गेल्यानंतर त्यात आणखी दोन शहरांची भर पडणार आहे. यात नागपूर, नांदेड, पुणे या शहरांचा समावेश असून, दिनांक २७ पासून सुरू होणार आहे. कमी वेळेत ही मोठी शहर गाठता येणार आहेत.
नांदेड शहरातील श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावरून देशाच्या विविध भागातील महत्त्वाच्या शहराला नादेड शहर हे विमानसेवेच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली बेंगलोर गाझियाबाद (दिल्ली) आणि हैदराबाद अहमदाबाद अशी विमानसेवा सेवा सुरू आहे. एक जूनपासून नांदेड हैदराबाद- तिरुपती ही नवी सेवा सुरू झाली आहे. आता २७ जूनपासून नागपूर, नांदेड, पुणे अशी विमानसेवा सुरू होणार आहे. भविष्यात आणखीही काही शहरांसाठी नादेडहून विमानसेवेची सुरुवात होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
नांदेड शहर हे हुजूर साहिब सचखंड गुरुद्वारा या धार्मिक स्थळामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. सचखंडचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून शीख भाविकांसह अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात नांदेड नगरीत येत असतात. पूर्वी सुरू असलेली विमान सेवा कोरोना महामारी काळात बंद पडली होती. परंतु गुरुद्वारा बोडांचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या पाठपुराव्याने स्टार एअर कंपनीने सर्वे केल्यानंतर विमानसेवा सुरू केली.
बेंगलोर- गाझियाबाद (दिल्ली) आणि हैदराबाद अहमदाबाद (गुजरात) अशी विमानसेवा सुरू आहे. या सर्व फेऱ्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने स्टार एयर कंपनीच्या व्यवस्थापनाने एक जूनपासून नांदेड हैदराबाद तिरुपती अशी विमानसेवा सुरू केली. नांदेडहून सायंकाळी चार वाजता हैदराबादकडे विमान उड्डाण घेते पुढे हैदराबाद विमानतळावर काही वेळ थांबून तेच विमान तिरुपतीकडे रवाना होत आहे.
आता नागपूरहून नांदेड ते पुणे अशी विमानसेवा येत्या २७ जूनपासून सुरू होत आहे. हे विमान सकाळी दहा वाजता नांदेडला पोहोचणार, त्यानंतर पुण्याकडे रवाना होणार आहे. या विमानसेवेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळाला तर लगेच मुंबई आणि गोबा अशी विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय स्टार एयर कंपनीने घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच या विमानसेवेमुळे नांदेडला भाविकांची संख्या वाढली आहे.
दररोज ही विमानसेवा सुरू असल्याने दिल्ली, चंदीगड, अमृतसर या भागातील शीख भाविक मोठ्या प्रमाणात शिख धर्माची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडच्या पवित्र भूमीत सचखंडचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. या सर्व भाविकांचे सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने दररोज स्वागत करण्यात येत आहे. विमानसेवेमुळे नादेडचा देशभरातील विविध शहरांशी चांगले संबंध निर्माण होण्यास मदत झाली आहे.
पुणे विमान सेवेमुळे नांदेड आणि पुणे तसेच महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून नागपूर या शहराशी आता नांदेड हवाई सेवेने जोडले जात आहे. पुणे हे सांस्कृतिक व शैक्षणिक चळवळीचे माहेरघर असल्याने आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी नांदेड व आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी वास्तव्यास असल्याने त्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांनाही आता या सेवेचा चांगला लाभ होणार आहे.