श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी बचाव आरक्षणासाठी प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे तसेच पुणे येथे ॲड. मंगेश ससाणे व ॲड. मृणाल ढोरे पाटील यांनी ७ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.त्याला माहूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज, बारा बलुतेदार, अलुतेदार,भटक्या विमुक्त जाती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. दि.२१ जून रोजी तहसीलदार माहुर यांचे मार्फत तसे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
ओबीसी समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात शिष्ट मंडळासह उपोषण स्थळी जावून उपोषणकर्त्यांची भेट घेण्याची व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात लेखी आश्वासन देण्याची विनंती केली आहे.
तसेच ओबीसी आरक्षाला धक्का लागल्यास ओबीसी बांधव मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरतील असा गंभीर इशारा दिला आहे.तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर सुनील बेहेरे,विलास गावंडे,किशन राठोड,सुरेश गिऱ्हे,राजू सौंदलकर,सचिन बेहेरे, जगदीश वडसकर,कैलाश राऊत, अमृत जगताप,विक्रम राठोड,विजय बेहेरे,नवीन राऊत आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.