नांदेड| लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात 20 नोंव्हेंबर 2024 रोजी मतदान होत असून त्याची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे व शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 142 (1) तरतुदीनुसार तसेच निवडणूक आयोगाच्या विविध निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ अनुज्ञप्ती मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
निवडणूकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी नांदेड जिल्ह्यात मतदान संपण्यापुर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यत 18 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपासून ते 20 नोंव्हेबर 2024 रोजी सांयकाळी 6 वाजेपर्यत किंवा मतदान संपेपर्यत तसेच मतमोजणीच्या दिवशी 23 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण दिवस मतमोजणी प्रक्रीया संपेपर्यत संपूर्ण नांदेड जिल्ह्यात अनुज्ञपती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.