हिमायतनगर,उत्कर्ष मादसवार | तालुक्यात सोमवारी रात्री ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस व विजांचा कडकडाट झाला. या दरम्यान घारापुर येथील हनुमान मंदिराच्या कळसावर वीज कोसळून कळसाचा काही भाग तुटून खाली पडला. सुदैवाने मंदिर परिसरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.


या घटनेनंतर स्थानिक वारकरी संप्रदायातील भक्तांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, “संकटमोचन हनुमानाने गावावरील संकट स्वतःवर घेतले, गावाची रक्षा केली.” यंदा शेतकऱ्यांनंतर आता निसर्गाचा प्रकोप सर्वत्र दिसून येत आहे. केवळ आधत्मिकतेचे वातावरण गावागावात निर्माण होऊ लागल्याने गावावरील संकट टळलं असे सत्संगाशी निगडित असणाऱ्या महिला – पुरुषांनी बोलून दाखवलं आहे.



दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे निसर्गाचा प्रकोप सर्वत्र जाणवतो आहे. मागील महिन्यात हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथील नागनाथ मंदिरावरही अशाच प्रकारे वीज कोसळून कळसाचा काही भाग पडला होता. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे गावकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, संकट काळात हनुमंत रायाची गावावर खास कृपा राहते. “गावाबाहेर संकटमोचन हनुमानाचे मंदिर असण्यामागे हाच विश्वास आहे की, गावावरील संकट तो स्वतः अंगावर घेतो,” अशी भावना भक्तांनी व्यक्त केली.



