हिमायतनगर| तालुक्यातील मौजे वाळकेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी सुभाष अंभोरे यांची मेंढी बिबट्याने फस्त केल्याची घटना आज दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वनविभागाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे.


वाळकेवाडी. ता. हिमायतनगर येथील अल्पभूधारक शेतकरी श्री सुभाष अंभोरे यांची शेत जमीन सोनारी बीट असलेल्या वनक्षेत्राच्या लगत आहे. ते सहकुटुंब सहपरिवार शेतातच वास्तव्यास राहत असतात. त्यांच्या शिवाय इतर काही शेतकरी कुटुंब सुद्धा वन्य प्राण्यापासून शेतीचे जतन करण्यासाठी शेतातच निवासाला राहत असतात. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांच्याकडे काही मेंढ्या असून, ते मेंढ्या चारण्यासाठी नियमित सकाळी आठच्या सुमारास मेंढ्या शेतीच्या बांधावर सोडतात.


चारत असताना एका मेंढीवर बिबट्याने हल्ला करून ती फस्त केली. सदर बाबतीत वन विभागाकडे नुकसान भरपाईसाठी आणि बिबट्यासारख्या हिंस्त्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांच्या संरक्षणाची मागणी केली. मात्र संबंधित बीटचे वनपाल श्री मेटकर यांनी सदर बाबतीत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य न घेता तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही अशी भाषा वापरली त्यामुळे शेतकऱ्याने नाराजी व्यक्त केली आहे. तरी वन विभागाने मृत मेंढीचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संबंधी शेतकरी करत आहे.




