उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील लाडका येथील शेतकऱ्यांच्या आखाड्यावरील म्हशी चोरून नेणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी पाठलाग करून पकडत उस्माननगर पोलिसांच्या हवाली केले असून, या गुन्ह्यात सामील असलेल्या चार आरोपी विरोधात उस्माननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.


कंधार तालुक्यातील लाडका येथील शेतकरी तानाजी शेषराव शिंदे यांचा लाडका शिवारात आखाडा आहे दिनांक ३० रोजी रात्री ते घरी आले असताना ही संधी साधून त्यांच्या म्हशी चोरटे चोरून घेऊन जात होते ही बाब हळदा येथील बालाजी गोविंद शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती तात्काळ शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर ते लगेच आखाड्यावर आले. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चार इसम हे चोरीच्या उद्देशाने म्हशी सोडून घेऊन जात असताना दिसून आले.


त्यावेळी शेतकऱ्यांनी आरडा ओरड करत अंधाराचा फायदा घेऊन पळून जाणाऱ्या चोरट्याचा पाठलाग करून चार जणांना पकडले. ही माहिती उस्माननगर पोलिसांना देण्यात आली यावेळी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करून विचारपूस केली. त्यांची नावे १) लवकुश नामदेव राठोड वय २५ वर्षे व्यावसाय मजुरी रा. शिराढोण ता.कंधार २) सतिश राजाराम ढाले वय २९ वर्षे व्यवसाय शेती रा. गोळेगाव ता. लोहा ३) राजु भगवान लांडगे वय 30 वर्षे व्यवसाय मजुरी रा. सावरगाव (पाच पिराचे) ता. लोहा व एक अल्पवियन मुलगा चारजण असे निष्पन्न झाले. त्या चारही आरोपी विरुद्ध फिर्यादी तानाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२),कलम ६२,कलम ३(५) अन्वये गुन्हा करण्यात दाखल करण्यात आला असून या आरोपी कडून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.




