हिमायतनगर/नांदेड| “रस्ता झाला” असे फलक लागले, पण प्रत्यक्षात करंजीकरांच्या पदरी पुन्हा चिखल, धूळ आणि धोका आला आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील बसस्थानक ते गावातील मंदिरापर्यंतचा मुख्य रस्ता अवघ्या सहा–सात महिन्यांतच उध्वस्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. अर्ध्या भागातील सिमेंट काँक्रेट रस्त्याचा अक्षरशः धुराडा उडाल्याचे चित्र असून, हे निष्कृष्ट काम नेमके कोणाच्या आशीर्वादाने झाले? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.


कोटीचा निधी, पण कामाची माती
गेल्या अनेक वर्षांपासून करंजी गावाचा मुख्य रस्ता दुरुस्त व्हावा, ही ग्रामस्थांची जुनी मागणी होती. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात ही बाब गांभीर्याने घेत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून रस्त्याच्या कामाला हिरवा कंदील दिला. मात्र, अपेक्षेच्या अगदी उलट चित्र समोर आले आहे.

अंदाजपत्रकाला बगल, गुणवत्तेला हरताळ
मंदिरापासून बसस्थानकाकडे झालेल्या सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामात नाल्यातील वाळूचा वापर, सिमेंटचे प्रमाण कमी, निकृष्ट दर्जाचे साहित्य अशा गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. याचा परिणाम म्हणजे रस्ता काही महिन्यांतच तुटू लागला, खड्डे पडले आणि धुळीचे साम्राज्य पसरले. विशेष म्हणजे, संबंधित गुत्तेदार अर्धवट काम करून बेपत्ता झाल्याचा आरोप असून, पावसाळ्यात ग्रामस्थांना पुन्हा एकदा चिखलातून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागला. “हे काम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच झाले, मग दोषी कोण?” असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.



नवे डांबरीकरण.. पण जुनी जखम कायम..?
सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामाबाबत काही प्रमाणात समाधान व्यक्त होत असले, तरी आधी झालेल्या सिमेंट काँक्रेट रस्त्याचा फज्जा नागरिक विसरलेले नाहीत. “पहिले काम इतके निकृष्ट कसे झाले? अधिकाऱ्यांनी तपासणीच केली नाही का?” असा रोखठोक सवाल ग्रामस्थ करत आहेत. करंजी ग्रामस्थांनी संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी, अंदाजपत्रकाला बगल देणाऱ्या गुत्तेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, तसेच सध्या सुरू असलेल्या कामाची तातडीने गुणवत्ता तपासणी करावी अशी जोरदार मागणी केली आहे.

दहा–वीस वर्षांची आशा धुळीस?
गेल्या दहा ते वीस वर्षांपासून करंजी गावाचा मुख्य रस्ता कधी चांगला होणार..? याकडे ग्रामस्थ डोळे लावून होते. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी निधी मंजूर करून ती आशा पूर्ण केली खरी, पण गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अवघ्या सहा महिन्यांतच सिमेंट काँक्रेट रस्त्याचा बोजवारा उडाल्याचा आरोप होत आहे. “आता तरी दोषींवर कारवाई होणार का?” हा सवाल आज प्रत्येक करंजीकराच्या ओठांवर आहे.

